आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग ११
आपण विरुद्ध म्हणजे काय हे पाहत होतो…
तुम्हाला सतत कोणती गोष्ट अधिक प्रमाणात करायची अथवा खायची सवय आहे का?
…असेल तर एकदा तपासून घ्या की ती गोष्ट तुमच्या शरीरासाठी योग्य आणि हितकर आहे का नाही?
का ते शरीरासाठी विरोधी आहे?
*विरुद्ध शब्दाची निरुक्ती – विशेषत:/प्रामुख्याने अवरोध करणे म्हणजे विरुद्ध (incompatible)*
आयुर्वेद शास्त्र सांगते….
देहधातुप्रत्यनीकभूतानि द्रव्याणि देहधातुभिर्विरोधमापद्यन्ते | चरक संहिता
शरीराचे जे धातु (शरीराला धारण करून ठेवणारे घटक) असतात; त्यांच्या गुणांच्या प्रत्यनीक (विरुद्ध) असणारी द्रव्ये शरीराच्या धातूंमध्ये विरोध निर्माण करतात आणि हा विरोध निर्माण झाल्यामुळे शरीरात काही लक्षणे जसे पुरळ उठणे, सूज, आग, गाठी होणे इ लक्षणे लगेचच अथवा दीर्घकाळाने दिसतात;
म्हणजे काय हो नक्की? 
म्हणजे असे की, जे शरीर उष्ण आहे त्या शरीरात अतिशय थंड (chilled) द्रव्यांचे सेवन सतत केले गेले तर ते शरीरातील धातुंमध्येही स्तब्धता, संकोच निर्माण करणार आहेत. असे स्तब्ध झालेले धातु स्वतः चे काम करतील का हो? त्यांच्यातील स्त्राव योग्य होईल का? किंवा उष्ण शरीरात अतिशय उष्ण असे पदार्थ सतत सेवन करत गेले तर ते ही शरीरातील धातुंमध्ये शिथिलता निर्माण करणारच ना. मग कुठे व्रण निर्मिती(ulcer), कुठे सूज (Inflammation), कुठे पाक (Boils), कुठे अतिशय रुक्षता (Dryness) अशी काही सहज दिसणारी काही शरीरात कुठेतरी आतील भागात आणि न दिसणारी विविध लक्षणे निर्माण होऊ शकतात.
सुरूवातीला ही लक्षणे कमी प्रमाणात दिसतात; पण जर या लक्षणांकडे दुर्लक्ष करत वरील प्रकारच्या पदार्थांचे सातत्याने सेवन करत गेले अथवा असा शरीरासाठी विरोधी आहार आणि विहार कायम चालू ठेवला तर ते पुढे मोठया प्रमाणात रोग निर्मिती करतात.
*विरुद्ध हे अनेक प्रकारचे असते. ते आपण शरीरात घेत असलेला आहार आणि विहार दोन्हींचे असू शकते*
आहाराने होणारे विरुद्ध येथे काही उदाहरणांद्वारे देत आहे.
असे अनेक प्रकारचे विरुद्ध पाहायला मिळते. विरुद्ध हे केवळ आहारानेच होईल असेही नाही. काही विरुध्द हे विहाराने म्हणजेच ज्या क्रिया आपण करतो त्यानेही होते. यातील काही सोपी उदाहरणे पुढील भागात पाहुयात. खरे तर विशिष्ठ रोगासाठी शरीरात जाणारे विशिष्ठ विरुद्ध ओळखून ते बंद करून त्यावर चिकित्सा करणे ही आयुर्वेदातील तज्ञता (specialization) मानता येईल.
क्रमशः…..
आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग १२
#विरुद्ध म्हणजे प्रतिकार अथवा विरोध करणे
(Incompatible for body) हे आपण पाहत आहोत.
जसे काही आहारातील पदार्थ विरुध्द असतात तसेच काही विहार म्हणजेच शरीराच्या केलेल्या हालचाली ही विरुद्ध असतात. याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो.
खालील अनेक शारीरिक विरुद्ध आपण अनेकवेळा करत असतो.
हे आणि असे अनेक उद्योग शरीरातील दोष अचानक वाढवू शकतात. अशावेळी कधी लक्षणे हळू हळू निर्माण होतात अथवा अचानक निर्माण होऊ शकतात. यांच्या सातत्याने मात्र दोष शरीरात वाढून रोग निर्मितीकडे शरिराची वाटचाल होत असते….
काही विहार आणि आहार एकत्र विरुद्ध असतात.
कारण, कोणतेही अन्न पचणे हे तासांवर अवलंबून नसून ते आपला अग्नि, घेतलेला आहार यावर अवलंबून असते. त्यामुळे जेवण झाल्यावर ३ तासानंतर व्यायाम केला तर चालेल का? हा प्रश्न निदान एखाद्या वैद्याला तरी विचारू नये. व्यायामाची योग्य वेळ ही साधारणत: सकाळचीच असावी. (सविस्तर विचार व्यायामाच्या लेखात करूयात).
आपण आहारासंबधी विचार करत होतो. विरुद्ध हा विषय आल्याने त्याच्या अनुषंगाने शरीर विरोधी विहार पाहिला….पुढील भागात पुन्हा आहार घेण्यासंबंधी इतर गोष्टी पाहुयात.
क्रमशः…..
आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग १३
जेवण करत असतानाचे नियम सांगत असताना ते कसे करावे हे आयुर्वेदशास्त्र विस्ताराने सांगते….
इष्टे देशे इष्टसर्वोपकरणं चाश्नीयात्;
इष्ट म्हणजे व्यक्तिसापेक्ष यथायोग्य, जागा आणि सर्व उपकरणांनी युक्त होऊन जेवण करावे. 
व्यक्तिसापेक्ष यासाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते…एक चिकित्साशास्त्रासंबंधी कादंबरीस्वरुपी पुस्तक वाचत होते. त्यामध्ये एक डॉक्टर स्वतःच्या एका पेशंटच्या केसबद्दल विशिष्ठ माहिती जमवत असतो. तो रुग्ण दगावल्यामुळे त्याचे शवविच्छेदन केल्यावर त्याचा रिपोर्ट तातडीने मिळवण्यासाठी त्या वैद्यास त्याच चिकित्सालयातील शवविच्छेदनाच्या विभागात तातडीने जावे लागते. तिथे असलेली ती महिला डॉक्टर शवविच्छेदनाच्या खोलीबाहेरील ऑफिसमध्ये जेवत असते. त्यावेळी रिपोर्ट घेण्यासाठी आलेल्या डॉक्टरच्या मनाची स्थिती तेथे वर्णन केली आहे. त्याला वाटत असते, की ही महिला या खोलीत कशी जेवू शकते? पण, त्या महिलेच्या दृष्टीने पाहिल्यास कॅन्टीनपर्यंत जाऊन कामामध्ये व्यत्यय आणून अथवा भुकेची वेळ टाळून जेवण करण्यापेक्षा घरून आणलेला डबा तेथेच उघडून भुकेच्या वेळी खाणे हे तिला इष्ट वाटणे साहजिक आहे. अनेक व्यक्तींना आपापल्या कामाच्या ठिकाणी जेवण करावेच लागते. मग एखादा सतत रक्ताने माखलेले हात असलेला सर्जन असो अथवा एखादा मातीने हात माखलेला कुंभार, अथवा घरे बांधणारा कामगार. त्यांना कामाच्यामध्ये वेळ काढून असेल तिथेच हात धुवून जेवावेच लागते.
तरीही जेवायला बसताना जर जागा योग्य नसेल, जेवण पुरेसे नसेल अथवा जेवताना घेतले गेलेले साहित्य जसे ताट, वाटी, चमचा, पाणी इ नसेल तर या सर्व गोष्टींचा मनावर परिणाम होत राहतो आणि जेवताना मन जर जागेवर नसेल तर मनोविघात होऊन आजार निर्माण होतात हे आपण मागेच पाहिले आहे.
म्हणूनच आयुर्वेदशास्त्र सांगते….
इष्टे हि देशे भुञ्जानो नानिष्टदेशजैर्मनोविघातकरैर्भावैर्मनोविघातं प्राप्नोति, तथैवेष्टैः सर्वोपकरणैः;l
तेव्हा जेवायला बसताना खालील गोष्टी पाळाव्यात.
सर्व गोष्टीत आजकाल संशोधनाची आवश्यकता वाटते त्यामुळे हे संशोधन येथे देत आहे. 
सध्या आपल्या आप्तांनी अथवा घरातील मोठ्या व्यक्तीने काही सांगण्यापेक्षा लोकांना WhatsApp, Facebook किंवा संशोधन पत्रकांवर विश्वास अधिक असतो. त्यामुळे ज्या गोष्टी प्रत्यक्ष आपल्याला अनुभवातून समजतात त्यातही संशोधने केली जातात
.….असो.
क्रमशः…..
आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग १४
Hunger is a good cook!!
Delicious food can increase your hunger!!
आयुर्वेदशास्त्र सांगते….
इष्टवर्णगन्धरसस्पर्शं विधिविहितमन्नपानं प्राणिनां प्राणिसञ्ज्ञकानां प्राणमाचक्षते कुशलाः, प्रत्यक्षफलदर्शनात्; l चरकसंहिता
आचार्य पुनर्वसु म्हणतात, हे प्रत्यक्ष दिसते की आहाराचा सुंदर गंध/वास (फोडणीचा, भाजल्याचा, तळल्याचा वास इ), वर्ण (धुणे, भाजणे, तळणे इ योग्य प्रक्रिया केल्यावर त्यातून निर्माण झालेल्या अन्नाचा रंग) रस (यथायोग्य चव), स्पर्श (मऊ, कठीण, खरखरीत, कुरकुरीत) इ नी तयार अन्न जेव्हा आतापर्यंत सांगितलेल्या विधींनी (गरम, योग्य मात्रेत, योग्य काळी इ) सेवन केल्यास ते मनुष्य प्राण्यांमध्ये त्यांचा “प्राण” स्वरूप असते म्हणजेच ते आयुष्य वाढवणारे असते.
तदिन्धना ह्यन्तरग्नेः स्थितिः; तत् सत्त्वमूर्जयति, तच्छरीरधातुव्यूहबलवर्णेन्द्रियप्रसादकरं भवति l चरकसंहिता
ह्या प्रकारच्या आहाररुपी इंधनाने शरीरातील अग्नि, सध्या आपण याला “भूक” असे म्हणू, ही योग्य राहते. याने सर्व आहाराचे प्रत्येक धातुंमध्ये योग्य स्वरूपात रूपांतर होते. असे अन्न शरीरात बल वाढवते, शरीर धातू मजबूत करते, धातूंचे बल वाढवते, इंद्रिये बलवान करते, त्यांच्या क्षमता वाढवते. हे अन्न त्या त्या इंद्रियांचे पोषण करते.
दूर असलेल्या स्वयंपाक घरात चालू असलेल्या आहाराच्या कृतीचा मनावर यथायोग्य परिणाम होत असतो आणि शरीरातील विविध स्त्राव स्त्रावतात.
प्रत्येक पदार्थांचा काही विशिष्ठ वास, चव, स्पर्श, स्वरूप आणि रंग असतो, ज्याने तो पदार्थ आपल्याला खावासा वाटतो. काही विशिष्ठ पदार्थ जसे कढी, सूप, सार, चटण्या, कोशिंबीर यांमध्ये गोड, आंबट, खारट, तिखट या सर्व चवी योग्य प्रमाणात असतील तरच ते पदार्थ खावेसे वाटतात.
विशेषत: कुजलेले, जुने – शिळे, खराब झालेले, बुरशी आलेले, चव गेलेले, वेगळी चव उत्पन्न झालेले पदार्थ ओळखता यायला हवेत. 


मुलांना लहानपणापासून जर या सर्व दृष्टीने आहार पारखण्याची सवय लावली तर कोणता आहार आपल्यासाठी योग्य आणि कोणता अयोग्य हे त्यांना नक्कीच समजेल. 
जेवायला बसल्यावर या सर्व गोष्टींचा विचार पालकांनी मुलांसमोर नक्कीच ठेवावा. त्यामुळे त्यांना योग्य आहार सेवन करण्याची दृष्टी मिळते. आपल्या शरीराच्या दृष्टीने योग्य काय हे पाहण्याची सवय लागते. केवळ जिभेचा मोह पुरवला म्हणजे शरीराचे पोषण होत नाही हे त्यांना समजावणे आवश्यक असते. याबरोबरच त्यांना आहारातील विविध रसाबाबतही जाणकार बनवावे. पुढील भागात रसांबद्दल विचार करूयात.
क्रमशः…..
आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग १५
#षड्रस VS #चौरस
आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की, चौरस आहार घ्यावा. गोड, आंबट, खारट आणि तिखट या चार चवींचे जिभेवरील स्थानही निश्चित केलेले आहे, हे ही आपल्याला शिकवले जाते. पाश्चात्यशास्त्रानुसार आहार हा चौरसयुक्त असतो. त्यांना कडू आणि तुरट रसांचे फार महत्त्व नाही. त्यांच्या रोजच्या आहारातही असे पदार्थ आपल्याला फारसे दिसत नाहीत.
सध्या आपल्याकडे नव्याने काही ट्रेण्ड येऊ लागले आहेत.
आम्ही सायंकाळी फक्त एकच धान्य खातो
आम्ही सकाळी संपूर्ण जेवण करतो आणि रोज सायंकाळी केवळ एकच पदार्थ करतो जसे उपमा, पोहे, धिरडे, थालीपीठ, डोसा इ. 
आम्ही रोज सकाळी मुसळी/कॉर्न फ्लेक्सआणि दूध हाच न्याहारी (breakfast) घेतो किंवा केवळ फळेच खातो आणि दुपारी केवळ भातच खातो. 
आमच्या मुलाला इडली डोसाच खूप आवडतो अथवा पाव भाजीच खूप आवडते आणि त्यात खूप भाज्या जातात म्हणून बरेच वेळा तीच केली जाते. 
आम्ही एका जेवणात केवळ पोळीच किंवा केवळ भातच खातो. 
आयुर्वेदशास्त्र सांगते…
एक रसाभ्यासो दौर्बल्यकराणाम् l चरक संहिता
जर कोणी एकाच रसाचा अभ्यास सतत सेवन करत असेल तर ते शरीरासाठी योग्य नाही. त्याने शरीर दुर्बल होते. 
सकाळच्यावेळी शरीरात कफाचे आधिक्य असताना आणि भूक नसताना दूध आणि फ्लेक्स अथवा फळे खाल्ली तर शरीरात कफ वाढत जातो. 

केवळ आंबट अथवा आंबवलेल्या पदार्थाच्या सतत सेवनाने शरीरात अजीर्ण, अम्लपित्त (सध्याच्या भाषेत आपण त्याला acidity म्हणू शकू) होऊ शकते. 
केवळ भाताचे सेवन केले तरी कफ वाढू शकतो. त्याने प्रमेह, स्थूलपणा, अजीर्ण असे इतर अनेक आजार होतात.
आजकाल मलप्रवृत्ती व्यवस्थित होण्यासाठी बरेच वेळा fibres आहारावर जोर दिला जातो. त्यात सॅलड्स चे प्रमाण भाजी पोळीपेक्षा अधिक असते.जर आहार मलाद्वारे केवळ बाहेरच घालवायचा असेल तर तो खायचाच कशासाठी?
असा आम्हाला प्रश्न पडतो. 
आयुर्वेदशास्त्र सांगते….
सर्वरसाभ्यासो बलकराणाम् l चरक संहिता
आपला भारतीय आहार हा सर्वगुणसंपन्न आहे. आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे त्यात सहा रस आहेत…
एकाच रसाच्या सतत सेवनाने शरीरावर कोणते परिणाम होतात हे ही आयुर्वेदात दिलेले आहे.
हे सर्व पदार्थ ४ प्रकारात मिळतात…
हे चारही प्रकारचे अन्न आपल्या जेवणात रोज असावेत हे ही मागील भागात आपण पाहिले.
सध्याच्या आहार योजनेच्या ज्ञानानुसारही भारतीय आहारही सर्व स्तरांवर योग्य ठरतो….
Carbohydrates(पोळी,भात, गोड पदार्थ) 60-70%,
Protein(डाळींचे पदार्थ, मांसाहार, दूध इ) 10-12%,
Fats(तेल, तूप) 10-20%,
Minerals(मीठ, भाज्या), Fibres(भाज्या, Salads) and Vitamins(भाज्या, फळे) सर्व मिळून 1-2%
या सर्व पदार्थांमुळे बाहेरील पांचभौतिक घटकांचे शरीरातील पांचभौतिक घटकांमध्ये परिणमन होत असते आणि आहार शरीराच्या धातुंमध्ये रूपांतरित होतो.
समाप्त……..