• vdmeghana@swasthyaholistic.in
  • +91 932 561 2134

आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग १

रोजच्या जीवनात आपण विविध प्रकारे रोगांना सामोरे जात असतो. सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी हे साधारण होणारे आजार जे साधारण औषधांनी अथवा पथ्याने बरे होतात. 😌तर, प्रमेह, उच्च रक्तदाब (BP), त्वचारोग, Thyroid, PCOD असे शरीरात घर करून राहणारे आजार. 😒तर इतर काही आजार जसे कॅन्सर, क्षयरोग, हृद्रोग(Heart Disorder), यांसारखे दुर्धर आजार यापैकी काहींना अजूनही पूर्ण चिकित्सा उपलब्ध नाही.

आज पाहिले तर घरातील एक तरी व्यक्ती आजाराने ग्रस्त असतेच. मग आपण हा विचार केला आहे का? 🤔घरातील ज्या व्यक्ती आजारी नाहीत त्या तरी स्वस्थ आहेत का? अथवा पूर्णपणे निरोगी आहेत का? तर आज जाणून घेऊयात “स्वास्थ्य म्हणजे काय?”

आजपासून दर आठवड्यात एक अशी ही लेखमाला खास आपल्यासाठी 😊 आयुर्वेदशास्त्र सांगते समदोष: समाग्निश्च समधातू मलक्रिय: l प्रसन्नात्मेंद्रियमन: स्वस्थेत्यभिधियते ll चरक संहिता

तर स्वास्थ्याची इतकी सुंदर व्याख्या इतर कोणत्याही शास्त्रात नाही. शरीरात असणारे दोष, धातू आणि मल ज्यांना आयुर्वेदाने शरीराचे मूलभूत घटक मानले आहेत ज्यांच्यामुळे शरीरातील इतर घटक तयार होतात(रचनात्मक शरीर) हे सर्व साम्यावस्थेत असणे, त्यांच्या सर्वांच्या क्रिया म्हणजे त्यांच्याद्वारे शरीरात होणाऱ्या क्रिया(क्रियात्मक शरीर) यथायोग्य होणे आणि शरीरात आत्मा प्रसन्न, मन स्थिर आणि सर्व इंद्रिये योग्य पद्धतीने कार्यरत असणे हे जेव्हा असते तेव्हा आपण स्वतः ला “स्वस्थ” म्हणू शकतो.

थोडक्यात पुढे दिलेल्या गोष्टींपैकी जर आपल्याला काहीही होत असेल तर आपण “स्वस्थ नाही” असे मानू शकतो. बघुयात आपल्यापैकी किती जण स्वस्थ आहेत.

१. जर एखाद्या अवयवात जानवण्याइतपत अगदी कमी प्रमाणातही दु:ख / वेदना होत आहेत.
२. पोटात काहीतरी बारीकशी तक्रार कधीतरी अथवा मध्ये मध्ये होते अथवा पोट साफ होत नाही.
३. पोटात गॅसेस, पातळ/कठीण मलप्रवृत्ती होत आहे. रोज मलप्रवृत्तीच होत नाही.
४. चष्मा आहे, केस गळत आहेत.
५. मन अस्थिर/चंचल आहे.
६. आजार कोणताच नाही पण बैचेनी आहे (सारखे कसेतरी होतेय !!) 😊
७. सतत काहीतरी करावेसे वाटत राहणे आणि न केल्यास बेचैनी असणे.
८. कोणतीही गोष्ट केल्यावर थकवा, ताण येतो.
९. रोजचा दिनक्रम केल्यावर ताण जाणवतो.
१०. सकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही. अथवा सकाळी लवकर उठवेसेच वाटत नाही. उठले तर दिवसभर थकवा जाणवतो. काम करावेसे वाटत नाही.
११. सतत झोप येते.
१२. कमी वय असूनही बसून काम करावेसे वाटते अथवा पडून रहावेसे वाटते.
१३. सतत सर्दी, खोकला थोड्या थोड्या काळाने होतो.
यापैकी एक वा अनेक गोष्टी असतील तर आपण नक्कीच “स्वस्थ नाही”.

मग आपल्यापैकी कोण सांगू शकेल की “मी स्वस्थ आहे” ते?

क्रमश:…..

 

आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग २

आता मागील भागात आपण स्वास्थ्य म्हणजे काय? हे समजून घेतले तर आता आपण हे स्वास्थ्य कशामुळे बिघडते हे समजून घेणार आहोत.
 
आयुर्वेद सांगतो.
आहारसंभववस्तु रोगस्तु आहारसंभव: l चरक संहिता
 
याचा अर्थ असा की आहारापासून शरीर बनते आणि (केवळ आणि केवळ) आहाराचं रोगांची निर्मिती करतो.
हे कसे शक्य आहे?🤔 कारण आपल्याला तर माहीत आहे की रोग हे जीवजंतूनी (जसे virus and bacteria) होतात. मग रोजच्या घेतलेल्या आहाराने रोग कसे निर्माण होतील?
 
शरीरात जेव्हा आहाराचे पचन होते तेव्हा त्यापासून सर्व धातूंची निर्मिती होते. हे आपण जाणतो, म्हणजे शरीर हे आहारापासून बनते हे आपल्याला माहीत आहे.
 
आयुर्वेद शास्त्र सांगते,
दोषधातुमला: मूलं ही शरीरम् l चरक संहिता
 
आयुर्वेदशास्त्रानुसार शरीरातील मूलभूत घटक म्हणजेच ३ दोष, ७ धातु आणि ३ मल. हे सर्व दोष, धातु, मल घटक रोज नव्याने घेतलेल्या आहाराने कमी जास्त प्रमाणात बनत असतात. अगदी आधुनिक वैद्यकाचा विचार केला तरी त्यात सांगितलेले शरीराचे मूलभूत घटक हे सुद्धा आहारानेच बनणार आहेत म्हणजेच प्रत्येक cell, tissue, enzymes, hormones, blood, lymph इ. आहारानेच बनतात आणि त्याचे कमी जास्त प्रमाण हे कोणत्या प्रकारचा आहार घेतला गेला आहे त्यानेच ठरणार आहे. आता आपण जरा आधुनिक वैद्यकीचा चष्मा उतरवून आयुर्वेदाच्या नजरेतून पाहुयात.
तर आयुर्वेद शास्त्रानुसार दोष, धातु आणि मल हे आहारापासून बनतात. जर आहार योग्य घेतला तर ते घटक योग्य मात्रेत (quantity) आणि योग्य पद्धतीने (Quality) म्हणजे त्यांचे स्वतःचे कार्य योग्य पद्धतीने करणारे होणार आहेत.
जर आहार अयोग्य पद्धतीने घेतला तर रोजचे या दोष धातु आणि मलांचे प्रमाण शरीरात कमी अथवा जास्त होणार आहे आणि जर सतत त्याच त्याच पद्धतीचा म्हणजे चुकीचा आहार घेत राहिला तर हे प्रमाण शरीरात वाढून वा कमी राहिल्याने ते शरीरास घातक ठरणार आहेत.
 
उदा.
🍁जर अधिक प्रमाणात गोड पदार्थ, थंड पाणी अथवा थंड पदार्थ घेतले तर ते शरीरात कफ वाढवणार आहे.
 
🍁जर कोरडे, कठीण, द्रवता नसलेले पदार्थ अथवा वारा सतत सेवन केला अथवा वेगवान वाहनात सतत प्रवास झाला तर शरीरात वात वाढणार आहे.
 
🍁जर अधिक प्रमाणात मिरची, मीठ, अथवा उष्ण पदार्थांचे सेवन सतत करत गेले तर शरीरात पित्त वाढणार आहे.
वाढते का नाही? 🤨मग जर असे पदार्थ रोजच सेवन करत गेले तर वात, पित्त आणि कफ शरीरात कायमच वाढत राहून शरीरातील अवयवांमध्ये रोगनिर्मिती करत राहणार आहे. पित्ताने साधारणत: होणारे अम्लपित्त (acidity), डोकेदुःखी, मूळव्याध, पित्ताची वांती अथवा उच्च रक्तदाब, ताप. वाताने होणारे संधिवात, आमवात, पोटदुखी यांसारखे आजार. तर काफाने होणारे सर्दी, खोकला, इथपासून ते मूत्ररोग, प्रमेह पर्यंत कोणतेही आजार शरीरात घर करून राहणार आणि जर ह्या आजाराकडे दुर्लक्ष झाले तर पुढे त्वचारोग, कॅन्सर, vericose veins, hemorrhage, liver disorders, PCOD, FIbroid, Parkinson, migraine इतर अनेक आजार होत राहतात आणि ते शरीरात घर करून बसतात.🥺
 
आता कोणत्या दोषाने कोणता आजार निर्माण झाला आहे, ह्याची काळजी तुम्हाला करायची गरज नाही, तज्ञ वैद्यांना तुमच्या हेतूवरून(तुम्ही कोणता आहार आणि विहार केला आहे त्यावरून) आणि तुमच्या लक्षणावरून ते समजते.
 
यावरून एवढे मात्र कळले की आहार हाच आपल्या अनेक आजारांचे मूळ आहे. तरीही आपल्या मनात जी शंका आहे की bacteria ani virus मुळे होणाऱ्या आजारांचे काय? 🤔याचा विचार आपण पुढे कधीतरी सविस्तर करूयात. सध्या आपण आहाराविषयी जाणून घेऊयात. 🤗

क्रमशः…..

आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग ३

तर मागे आपण स्वास्थ्य म्हणजे काय आणि शरीर आणि रोग दोन्ही निर्माण होण्यासाठी आहार कसा महत्त्वाचा आहे हे पाहिले. आता आपण यापुढे आयुर्वेदानुसार आहार कसा असावा हे पाहणार आहोत.
 
आयुर्वेदशास्त्रामध्ये आहार घेण्यासाठी काही विशिष्ठ विधी सांगितला आहे. तो आठ प्रकारचा आहे. विधी म्हणजे नियम.. म्हणून त्याला “अष्ठविधआहारविधीविशेष आयतन” – आठ प्रकारचे आहार घेण्यासाठीचे नियम असे म्हणले जाते.
 
आयतन म्हणजे मार्ग. आहार सेवन करण्याचा हा विशेष मार्ग आहे. याप्रमाणे आहार सेवन केल्यास आपण स्वास्थ्य प्राप्ती नक्कीच करू शकतो. इतकी आहार विषयक वैज्ञानिक भूमिका कोणत्याही शास्त्रात वर्णिलेली दिसत नाही. अष्ठविधआहारविधीविशेष आयतन प्रमाणे आहारसेवन करण्याचे वेगळे नियम ही दिलेले आहेत.
 
आयुर्वेदशास्त्र सांगते….
🍁उष्णमश्नीयात् – अन्न नेहमी गरम असावे. ताजे आणि गरम अन्न नेहमी खावे.🫕
 
🍁स्निग्धमश्नीयात् – अन्न स्नेहयुक्त असावे. रोजच्या आहारात काही प्रमाणात तेल, तूप अथवा दूध, दही, मांसरस यांसारख्या पदार्थांचा समावेश असावा. दूध, दही आणि मांसरस हे कसे घ्यावेत यांचे वेगळे नियम ही दिलेले आहेत.🧉
 
🍁मात्रावदश्नीयात् – आहार हा नेहमीच योग्य मात्रेत/प्रमाणात असावा. हे प्रमाण आपल्या अग्निनुसार असावे. भूक लागणे आणि आपला अग्नि चांगला असणे यात बराच फरक आहे हे येथे लक्षात घ्यावे. 🧐
 
🍁जीर्णेऽश्नीयात् – पहिला आहार जीर्ण झाल्यावर पुढचा आहार घ्यावा. आहार जीर्ण होण्याची काही लक्षणे दिलेली आहेत ती पुढे पाहुयात. ती लक्षणे दिसल्यावरच आहार घ्यावा.🤗
 
🍁वीर्याविरुद्धमश्नीयात् – वीर्य विरुद्ध आहार सेवन करू नये. वीर्य म्हणजे द्रव्याची ताकद. वीर्य दोन/आठ प्रकारचे असते. उदाहरणार्थ उष्णवीर्य*शीतवीर्य. मग अशा दोन विरुद्ध वीर्य असणाऱ्या गोष्टींचे सेवन एकत्र करू नये. असे केल्यास शरीरात दोष वाढून रोग होतात.🤔
 
🍁इष्टे देशे इष्टसर्वोपकरणं चाश्नीयात् – आपल्याला योग्य असलेल्या/आवडत्या जागेत आणि सर्व उपकरणांनी युक्त असताना आहार सेवन करावे.😊
 
🍁नातिद्रुतमश्नीयात् – खूप भराभर जेवण करू नये. अर्थात् सावकाश जेवावे. 👍
 
🍁नातिविलम्बितमश्नीयात् – खूप वेळ /अति विलंबाने ही जेवू नये. 🤗
 
🍁अजल्पन्नहसन् तन्मना भुञ्जीत – जेवताना खूप बोलत बोलत आणि जोर जोरात हसत हसत जेवू नये. 😌
 
🍁आत्मानमभिसमीक्ष्य भुञ्जीत सम्यक् – आपल्या शरीरासाठी काय हवे, काय नको, किती हवे, किती नको याचा यथायोग्य विचार करत अन्नभक्षण करावे. इतर गोष्टींचा विचार करत, कोणाला तरी नावे ठेवत, अथवा कोणावर चिडत जेवण करू नये. 🙂
 
कारण,
मात्रयाऽप्यभ्यवहृतं पथ्यं चान्नं न जीर्यति|
चिन्ताशोकभयक्रोधदुःखशय्याप्रजागरैः|| चरक संहिता
 
योग्य प्रमाणात सेवन केलेले पथ्यकर अन्नसुद्धा जर चिंता, शोक, भय, क्रोध, दु:ख, रात्री जागरण यांच्यामुळे योग्य प्रकारे पचत नाही. 😪🥺😡😠😓
 
जेवण करत असताना ऑफिस/घरातील चालू गोष्टींवर विचार येत असतील किंवा सतत मनात चिंता, भीती किंवा दु:ख असेल तर घेण्यात येणारा आहार पचण्यासाठीचे शरीरातील कार्य व्यवस्थित होत नाही. त्यामुळे न पचलेला आहार शरीरात दोष निर्माण करतो. त्यानेही रोग निर्माण होतात. Stress, Tension याने निर्माण होणारे रोग हे असे होत असतात. सध्या होणारा Diabetes ह्यामागे stress मुळे निर्माण होणारे अपचन हे एक महत्त्वाचे कारण आहे.
 
त्यामुळे हे नियम जाणून घेण्यासाठी पुढील काही भागांमध्ये आपण एक एका नियमावर विस्तृत विचार करूयात.

क्रमशः……

आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग ४

“आई मला गरम पोळी कर ना ग! किती छान लागते ती.” 🤗 आई म्हणते “अगं सोना, मला खरचं वेळ नाही ग. मगाशीच करून ठेवल्या आहेत डब्यात, त्यातली घे.” 😓 असे दररोजच होते ना? अगदी सर्वांच्या घरी हेच होत असते. नुकतेच तयार केलेले गरम अन्न अथवा कोणतेही खाणे चवीला छान लागतेच, पण…हा पणच आड येतो आणि सर्व बिनसते.
मागील भागात आपण आहारसेवन करण्याचे नियमाचा विचार करत होतो. आजपासून आपण त्यातील एक एक नियमाचा विचार अधिक विस्ताराने करूयात.
 
आयुर्वेदशास्त्र सांगते….
उष्णमश्नीयात्; उष्णं हि भुज्यमानं स्वदते, ……l चरक संहिता
 
उष्ण आहार चवीला छान लागतो. उष्ण आहार म्हणजे आधीच तयार करून पुन्हा गरम केलेला आहार नाही, उष्ण म्हणजे प्रत्येक भोजनाच्या वेळी बनवलेला गरम, ताजा आहारचं सेवन करायचा आहे, तरच त्याचे योग्य गुण मिळतील. ह्या आहारामध्ये एक विशिष्ठ स्वाद असतो, तो थंड झालेल्या अथवा पुन्हा गरम केलेल्या आहारात मिळत नाही. मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या आहारात तर हा स्वाद नाहीच नाही. 🙄
अर्थात् ज्याला तो स्वाद माहित आहे त्यालाच त्याचे महत्त्व. बाकी सर्वांसाठी केवळ उदरभरण…. 🥱
 
असा उष्ण आहार सेवन केल्याने पोटातील अग्नि वाढतो. (अग्नि ही विशिष्ठ संकल्पना आयुर्वेदशास्त्राने मांडली आहे). हा रुग्णांचा अग्नि ज्याला कळला तो खरा वैद्य आणि तो ज्याने सांभाळला तो खरा स्वस्थ मनुष्य. 🤗
 
मनुष्य हा warm blooded प्राणी मानाला जातो. आचार्य सुश्रुत म्हणतात रक्त हे अनुष्णशीत आहे. असे असताना जर आहारात अतिशय थंड पदार्थ अथवा अतिशय उष्ण पदार्थ घेतले गेले तर ते शरीरातील अग्नि कमी करतात आणि दोष वाढवतात (कारण ते शरीराच्या गुणांच्या विरुद्ध आहेत. आता विरुद्ध(incompatible) ही अजून एक विशेष संकल्पना आयुर्वेदशास्त्र मानते. हे पुढे पाहुयात.) 🤔 त्यामुळे तो आहार पचवायला अधिक वेळ लागतो.
उष्ण आहाराचे शरीरातील धातुंमध्ये पटकन रूपांतर होते. तसे थंड आहाराचे होत नाही. जसे, आपण विरजण लावताना जर दूध हे फ्रिजमधून काढलेले असेल आणि त्याचे जर विरजण घालून दही लावले तर ते दही खूपच उशीरा लागते अथवा काही वेळेस नीटसे लागतही नाही. जर हे दही लावत असताना दूध कोमट असेल अथवा वातावरणातील तापमानाचे असेल तर ते लवकर लागते. म्हणजेच जशी fermentation होण्यासाठी विशिष्ठ तापमानाची गरज असते. तसेच, आहार पचनासाठीही आहार एका विशिष्ठ तापमानाचा असावा लागतो. 🧐😇
उष्ण आहार हा शरीरातील अपान वायूचे अनुलोमन करतो. आपल्या शरीरात असणाऱ्या तीन दोषांपैकी एक म्हणजे “वायू”. त्याचा एक प्रकार ‘अपान वायू’. त्याचे काम शरीराच्या खालील दिशेला होत असते. तो जर वरील दिशेला येऊ लागला तर तो शरीरात विविध आजार निर्माण करू शकतो. त्यामुळे त्याचे अनुलोमन म्हणजे त्याच्या योग्य दिशेने त्याचे वहन झाल्याने मल-मूत्र व्यवस्थित होतात.
 
उष्ण पदार्थ हे वाताबरोबरच शरीरातील कफही कमी करतात. वात आणि कफ हे दोघेही थंड, शीतल गुणाचे आहेत. त्यामुळे त्यांना उष्ण आहार कमी करतो.
मग जर आपण दररोज थंड झालेला आहार सतत सेवन केला, थंड फळे, आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ आणि सॉफ्ट- हार्ड ड्रिंक्स सारखी थंड पेय यांचे सतत सेवन केले तर शरीरात जाणाऱ्या या विरुद्ध गुणाच्या पदार्थाने शरीरातील धातुत वात आणि कफ हे दोष वाढून सर्दी, खोकला, ताप, शरीरात जडपणा, आमदोष होणारच आहेत. 😊
 
थंड आहार केव्हा सेवन करावा. 🤔
उन्हाळ्यात जेव्हा बाहेरील तापमान खूप वाढल्याने शरीराचेही तापमान वाढले आहे, तेव्हा थंड पेय अथवा फळे, वा इतर पदार्थ जे शरीरातील तापमान (३६ डिग्री सेल्सियस) पर्यंत कमी करतील इतक्या प्रमाणात सेवन करावा. जर उन्हाळ्यातही आपण अधिक प्रमाणात थंड पदार्थ सेवन केले तरीही कफ वाढण्याची शक्यता असते. अनेक जणांना उन्हाळ्यातही सर्दी खोकला ताप होण्याची ही कारणे आहेत.
 
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एक प्रश्न पडेल की मग आहार पुन्हा गरम करावा का नाही? करण्यास हरकत नाही पण जे फायदे नुकत्याच तयार केलेल्या अन्नाचे आहेत ते मिळणार नाहीत. आपले आरोग्य हे जर आहारावर अवलंबून असेल तर आपण कशाला महत्त्व द्यायचे आणि असा नुकताच गरम केलेला आहार कसा करावा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. 👍
 
पर्याय – राइस कुकर चा वापर, आपल्याकडे येणाऱ्या बाईला जेवणाच्या वेळेस बोलावणे, अथवा थोडी तयारी करून जाणे आणि फोडण्या अथवा पोळ्या अगदी जेवायला बसताना करणे. जितके शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न तर निश्चित करता येईल. 🤗
 
तर मग आजपासून सर्वजण उष्णच आहार घेणार ना?

क्रमशः….

आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग ५

संजय – “मीरा थोडे तूप वाढतेस का ग?”…
मीरा – “अरे आधीच वजन किती वाढत आहे तुझे ? तूप खाऊन अजून जाड होशील. Cholesterol ही वाढेल तुझे. “
संजय – कोणतेही तूप खाऊन कोणी जाड होत नाही आणि cholesterol ही वाढत नाही.
 
मीरा – आणि हे आपल्याला कोणी सांगितले?
 
संजय – Whatapp वर आले होते.
 
मीरा – तूप चांगलेच असते पण ते तू खायला हवे का नको अथवा किती खायचे हे जाणून घ्यायला हवे आणि तुला किती वेळा सांगितले, असे काही वाचत जाऊ नकोस. वैद्य काय सांगत आहेत ऐक.
 
तर मागील भागात आहार उष्ण असावा हे आपण पाहिले. आता पुढे
आयुर्वेदशास्त्र सांगते…..
स्निग्धमश्नीयात्; स्निग्धं हि भुज्यमानं स्वदते, भुक्तं …….l चरक संहिता
 
आहार हा नेहमी स्निग्ध असावा म्हणजे दररोजच्या आहारात स्नेहाचे योग्य प्रमाण असावे. शरीरात स्नेह मृदुता उत्पन्न करणाऱ्या द्रव्यांना “स्निग्ध” असे म्हणले जाते. स्निह शब्दाचा अर्थ मसृणता किंवा चिक्कणता उत्पन्न करणे. मग जे जे पदार्थ असा स्नेह निर्माण करतात त्यांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. त्यात पाणी, तेल, तूप, लोणी, दही बटर, दूध आणि दुधाचे पदार्थ, मांसरस, सार, आमटी, ताक, कढी, सूप इ पदार्थ येतात. त्यापैकी काही जेवणात असावेत.
 
पाणी हे सुद्धा स्नेह उत्पन्न करते बरं का! त्यामुळे वरील पैकी काही पदार्थ आपल्या जेवणात असावेत. मात्र यांचे प्रमाण आपल्या स्वतःच्या पचनशक्तीनुसार असावे. त्यातील कोणते पदार्थ आणि किती प्रमाणात आपल्या शरीरासाठी योग्य आहेत हे आपण स्वतः आपल्या अग्निनुसार ठरवायचे आहेत. प्रमाणाबाबत आपण पुढे विचार करणारच आहोत. परंतु येथे तेल, तूप इ पदार्थांचा विचार करताना आपला अग्नि, व्यायाम, आपल्या शरीराची रोजची हालचाल, बैद्धिक काम या सर्वांचा विचार करावा लागतो. ज्यांना हे जमत नाही त्यांना डाएटिशियनकडे जावे लागते. पण आपण हे समजून घेऊयात की आपले शरीर हे इतर कोणाहीपेक्षा आपल्यालाच माहित असते. यावर पुन्हा विचार करूयात.
 
मोठ्या प्रमाणात स्निग्ध आहार कोणी करावा –
🍁 जे उन्हात खूप काम करतात.
 
🍁 जे खूप व्यायाम करतात. पळणे, चालणे, जिम इ.
 
🍁 जे सतत खूप बौध्दिक काम करतात. पण केवळ बसून करत नाहीत.
 
🍁 जागरण करणाऱ्या व्यक्ती.
स्नेहाने परिपूर्ण आहार हा यथायोग्य स्वाद उत्पन्न करतो. अश्या आहाराने ही अग्नि वाढतो. हा आहार लवकर पचतो. सर्व स्निग्ध पदार्थांमध्ये देशी गायीचे (A2 दुधापासून बनवलेले) तूप हे सर्वात उत्तम आहे. ते अग्नि वाढवण्याबरोबर आहार पचनासाठीही मदत करते. तसेच ते बुद्धीही वाढवते. आयुर्वेद शास्त्रानुसार तूप जरी थंड गुणाचे असले तरी ते अग्नि वाढवण्यास मदत करते. जसे यज्ञामधील अग्नि मंद झाला की पुरोहित तुपाची आहुती देतात, अगदी असेच…त्यामुळे जेवताना देशी गायीचे तूप असावेच…तेही घरी केलेले असावे.
 
असा स्निग्ध आहार वाताची गती योग्य दिशेने करतो. पुन्हा उष्ण आहाराने जे कार्य होते तेच म्हणजे मल, मूत्र योग्य पद्धतीने शरीराबाहेर जाणे ते या आहाराने होते. हा आहार शरीराचे पोषणही व्यवस्थित करतो आणि शरीराची शक्ती वाढवतो. स्निग्ध आहार इंद्रियांचे कार्य वाढवतो तसेच त्यांना शक्ती देतो.
 
स्निग्ध आहाराने मेद धातु किंवा स्थूलपणा वाढतोच. परंतु या आहाराला व्यायामाची जोड मिळाली तर शरीर चांगले दणकट, आणि सुडौल होते. तूप, लोणी इ पदार्थ योग्य मात्रेत सेवन केल्यास शरीराची त्वचा मऊ होऊन कांती वाढते.
 
ऊस गोड लागला म्हणून तो अतिप्रमाणात खाऊ नये तसे…आता हे पदार्थ अतिप्रमाणात सेवन केल्यास ते शरीराचे अतिरिक्त पोषण करतत आणि स्थूलता वाढवतात.
 
सध्या आपल्या घरात तयार होणाऱ्या नैसर्गिक लोणी, तूप, आणि दही यापेक्षा बाहेरचे चीझ, पनीर, आणि बटर आपण जास्त प्रमाणात खातो; ज्यामधून वरील गुणधर्म कमी प्रमाणात मिळतात. कारण हे पदार्थ पचायलाच अग्निवर अधिक ताण येतो. घरी केलेले लोणी, तूप हे विशिष्ठ प्रक्रिया करून बनवले जातात, जी प्रक्रिया शरीरासाठी हितकर आहे म्हणजेच त्याने शरीरातील धातु योग्य पद्धतीने उत्पन्न होतात ते चीझ, पनीर इ. ने होत नाही. त्याने केवळ मेद वाढतो.
दूधही चांगला स्नेह उत्पन्न करते. ते पूर्ण अन्न आहे, परंतु ते जर जेवणात घेतले तर ते इतर अन्नासह एकत्र होऊन त्याचे गुण कमी होऊ शकतात. त्यामुळे ते जेवणात न घेता वेगळे घ्यावे, म्हणजे एक जेवण पचल्यावर चांगली भूक असताना घ्यावे. तसेच अनेकदा अन्नाबरोबर घेताना ते पचायलाही जड होऊ शकते.
 
वरील सर्व पदार्थ अग्नि योग्य असताना सेवन करत गेले तर ते शरीरात स्नेह (bonding) सुद्धा नक्कीच तयार करतात. पुन्हा अग्नि ही संकल्पना येथे समजून घेणे आवश्यक आहे. परंतु जर तो अग्नि योग्य नसेल अथवा अजीर्ण असताना हे पदार्थ सेवन केले गेले तर त्यांचे शरीरात योग्य पचन होत नाही आणि ते स्थूलता, मेद वाढवणे, प्रमेह, रक्तदाब, मेदाच्या गाठी निर्माण करणे, cholesterol level वाढणे आणि शरीरात कफ निर्माण करून विविध भागात blockages निर्माण करून विविध रोगांना आमंत्रण देऊ शकतात.

क्रमशः…..