आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग ६
घरात नवीनच आलेली सून…..आहो, सासूबाई किती कमी जेवण करता तुम्ही…
डॉक्टर, जरा बघा ना हीची आई गेल्यापासून जेवणच कमी झाले हीचे ! कितीतरी टॉनिक दिले तरी काही फरक पडत नाही…
आमच्याकडची कामाला ठेवलेली गावाकडची मुलगी आहे ना ती फारच कमी जेवते…आम्ही किती वेळा तिला सांगतो की व्यवस्थित जेव..पण ताकद मात्र भरपूर, कितीही जड वजन उचलायला सांगितले तरी…आणि काटक ही तितकीच…
“अरे आत्ता काय icecream खातोस…जेवणाची वेळ झाली आहे…मग जेवण नीट होणार नाही.” इति आजी. नातू ” असे काही होत नाही ग आजी…मी व्यवस्थित जेवण…”. आणि दुसऱ्या दिवशी नातू आजारी.
आहेत ना वेगवेगळ्या परिस्थिती…
या भागात आपण “अन्नाचे प्रमाण” या विषयी चर्चा करुयात. विषय मोठा असल्याने पुढील १-२ भाग यावरच चर्चा करुयात.
तर आयुर्वेदशास्त्र सांगते,
मात्रावदश्नीयात्; मात्रावद्धि भुक्तं वातपित्तकफानपीडयदायुरेव विवर्धयति केवलं, सुखं गुदमनुपर्येति, न चोष्माणमुपहन्ति, अव्यथं च परिपाकमेति; तस्मान्मात्रावदश्नीयात् l चरक संहिता
आहार योग्य प्रमाणातच घ्यावा.
योग्य प्रमाणात आहार घेतल्यामुळे हा पचलेला आहार शरीरात वात, पित्त, कफ असे कोणतेच दोष उगाचच वाढवत नाही; म्हणजेच सामान्य भाषेत सांगायचे तर हा आहार घेतल्यावर जेवण केल्यावर लगेच पोटात येणारा जडपणा, काही काळाने होणारे पित्त अथवा गॅसेस असे काही होत नाही; म्हणजेच आहार खूपच सुखाने पचतो आणि योग्य वेळी त्यातील न पचलेला काही भाग मलावाटे कोणताही त्रास न होता बाहेरही पडतो. त्यामुळे असा आहार पचल्यानंतर योग्य वेळी भूकही लागते. त्यामुळे असा आहार शरीरात ऊर्जा निर्माण करून आयुष्य वाढवतो.
जर या उलट अन्नसेवन केल्यानंतर शरीरात रोजच जडपणा येणे, पुढची भूक वेळेवर न लागणे, अम्लपित्त/जळजळ, छातीत आग पडणे, गॅसेस होणे, वांती होणे, डोके दुखणे, अपचन होणे, मलप्रवृत्ती व्यवस्थित न होणे अतिशय घट्ट अथवा पातळ शौचास होणे असे काहीही होत असेल तर यावर कोणतेही औषध घेण्यापूर्वी आहारात बदल करून पाहावा. येथे काय बदल करायचा ते आहाराचे प्रमाण आणि कोणता आहार घेत आहे त्यानुसार हे ठरवायला लागते.
हे आहाराचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार, ऋतूनुसार, आवडीच्या पदार्थानुसार, पदार्थाचे गुणधर्म, मानसिक स्थितीनुसार, देशानुसार, तसेच पहिले अन्न पचले आहे का नाही यानुसार बदलते.
वयानुसार – लहान मुलांचा आणि ७० वर्षापुढे असणाऱ्या व्यक्तींचा आहार तरुणव्यक्ती पेक्षा कमी असतो, काही स्त्रियांचा आहार तर काही पुरुषांचा आहार त्यांच्या त्यांच्या शरीराच्या प्रमाणानुसार, गरजेनुसार, त्यांच्या शारीरिक हालचालीनुसार कमी जास्त असू शकतो.
ऋतुनुसार – हिवाळ्यामध्ये आपल्याला चांगली भूक लागते. मात्र उन्हाळा आणि पावसाळा यात हिवाळ्यापेक्षा कमी भूक लागते.
कोणत्याही ऋतूत आजार असताना भूक कमीच लागते.
आवडीचा पदार्थ – काही वेळेस समोर असलेला पदार्थ हा खूप आवडीचा असतो; त्यावेळी त्याला पाहूनच आपली भूक वाढते. जर तेव्हा पाचक रस योग्य प्रमाणात स्रवले तर जास्ती घेतलेले अन्नही लवकर पचते. मात्र केवळ समोरचा पदार्थ कितीही आवडीचा असला मात्र अग्नि योग्य नसेल तर तो पदार्थ जास्त प्रमाणात खात राहिल्यास पचत नाही. तसेच आवडीचा पदार्थ हा शरीरास पोषक आहे का नाही हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. यालाच हितकर आहार म्हणतात. (या विषयावर पुढे विचार करू).
क्रमशः…..
आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग ७
मागील भागात आपण “अन्नाचे प्रमाण” या विषयी चर्चा करत होतो. तीच पुढे
आहाराचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार, ऋतूनुसार, आवडीच्या पदार्थानुसार, पदार्थाचे गुणधर्म, मानसिक स्थितीनुसार, देशानुसार, तसेच पहिले अन्न पचले आहे का नाही यानुसार बदलते. हे आपण पाहत होतो. 
त्यापैकी प्रत्येक व्यक्तीनुसार, ऋतूनुसार, आवडीचा पदार्थानुसार, आहाराचे प्रमाण कसे बदलते हे आपण पाहिले.
पदार्थाच्या गुणधर्मानुसार –
आहाराचे पचन किती वेळात होते हे आहाराच्या लघुता आणि गुरुता या गुणांवर अवलंबून असते.
काही पदार्थ हे लघु असतात म्हणजेच ते लवकर पचणारे असतात. जसे साळीच्या लाह्या, मूग, मसूर, राजगिरा, ताक, मसाल्यांनी युक्त पदार्थ, भाजलेले पदार्थ, पथ्यकर भाज्या, ज्वारी काही देवधान्य (millets) इ.
लघून्यग्निसन्धुक्षणस्वभावान्यल्पदोषाणि…चरक संहिता
लघु द्रव्ये अग्नि वाढवणारी, दोष कमी प्रमाणात उत्पन्न करणारी असतात.
तर काही पदार्थ गुरू/जड असतात म्हणजेच ते पचायला अधिक काळ घेतात. जसे दूध आणि दुधाचे पदार्थ, स्नेहयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ – विविध प्रकारची पिठे, पाकातील पदार्थ, गोड पदार्थ, फळे, इ (याविषयी सविस्तर पुढे बोलुयात)
गुरूणि पुनर्नाग्निसन्धुक्षणस्वभावान्यसामान्यात्…चरक संहिता
गुरू द्रव्ये सामान्यत: अग्नि न वाढवता तो कमी करणारी असतात.
पदार्थाचे प्रमाण त्यांच्या पचनाच्या कालावधीनुसार ठरवावे लागते.
आहार अधिक प्रमाणात अथवा कमी प्रमाणात घेतला तर काय लक्षणे दिसतात आणि तो किती प्रमाणात घ्यावा हे येथे पाहुयात.
आहारमात्रा पुन: व्यायामाग्निबलापेक्षिणी….चरक संहिता
आहाराचे प्रमाण हे तुला वजन काटा घेऊन रोज एकाच वजनाच्या कॅलरीज मोजून ठरवायचे नसते. ते व्यक्तीचा अग्नि आणि त्याने केलेला व्यायाम तसेच त्याच्या रोजच्या हालचाली यावर अवलंबून असते.
अग्नि योग्य असेल तर आहार लवकर पचतो; अग्नि जर कमी असेल तर कितीही वजन करून घेतलेला आहार ही उशीराच पचतो अथवा पचतच नाही.
व्यायामाने पूर्वीच्या घेतलेल्या आहाराचे यथायोग्य पचन होऊन त्याचे शरीर धातुंमध्ये रूपांतर होते आणि शरीराचे पोषण होते व ऊर्जा निर्मिती होते. व्यायाम न केल्यास मेदासारख्या एखाद्याच धातूंचे पोषण अधिक होऊन स्थौल्य निर्माण होते.
मग प्रत्येकाने आहार किती घ्यावा हे कसे ठरवायचे.
आयुर्वेद शास्त्र सांगते.
कुक्षेरप्रणीडनमाहारेण, हृदयस्यानवरोधः, पार्श्वयोरविपाटनम्, अनतिगौरवमुदरस्य, प्रीणनमिन्द्रियाणां, क्षुत्पिपासोपरमः, स्थानासनशयनगमनोच्छ्वासप्रश्वासहास्यसङ्कथासु सुखानुवृत्तिः, सायं प्रातश्च सुखेन परिणमनं, बलवर्णोपचयकरत्वं च; इति मात्रावतो लक्षणमाहारस्य भवति| चरक संहिता
जितक्या प्रमाणाच्या आहाराने
आता ही सर्व लक्षणे व्यक्तिसापेक्ष आहेत. आहार तज्ञास (dietitian) ला ही आपल्या शरीरातील लक्षणे कशी समजणार? 
घेत असलेल्या आहाराने पोटदुखी, अयोग्य मल प्रवृत्ती, अम्लपित्त, गॅसेस, उलट्या, जुलाब असे काही होत असेल तर लगेचच जवळच्या वैदयाकडे जाऊन आहारात बदल करून घ्यावा.
यापुढे कोणता आहार किती प्रमाणात घ्यावा हे पुढील भागात पाहुयात. 
क्रमशः…..
आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग ८
या भागात आपण वेगवेगळ्या प्रकारचा आहार आणि तो किती प्रमाणात घ्यावा याविषयी विचार करूयात.
आयुर्वेदशास्त्र सांगते….
आहारत्वमाहारस्यैकविधमर्थाभेदात् । स पुनर्द्वियोनिः स्थावरजङ्गमात्मकत्वात् । द्विविधः प्रभावो हिताहितोदर्कविशेषात् । चतुर्विधोपयोगः पानाशनभक्ष्यलेह्योपयोगात् । षडास्वादो रसभेदतः षड्विधत्वात्” । इति चरकः
हो हो…चहा आणि दूध हे सुद्धा आपला आहारच आहेत.
वरील सर्व पदार्थ प्रामुख्याने या रसाचे मानले जातात. हा त्यांचा प्रधान रस असतो, म्हणजे याचा अर्थ इतर रस कमी प्रमाणात त्यात असतात. जसे आवळ्यात आंबट बरोबर तुरट आणि गोड इ. रस ही जाणवतात. आवळ्यात एकूण ५ रस सांगितले जातात. त्यापैकी गोड रस हा सर्वात शेवटी जाणवतो म्हणून त्याला “अनुरस” म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ह्या तुरट आणि कडू रस युक्त असतात.
तसेच इतर अनेक पदार्थ हे सहा रसांपैकी एक वा अनेक रसांनी बनलेले असतात.
मग आपले जेवण कसे असावे? 
आपले जेवण हे नेहमी *सहाही* रसांनी युक्त असावे.
भारतात रोज घेतला जाणारा आहार हा साधारणतः सहाही रसांनी बनलेला असतो अथवा असावा. सहा रसांनी युक्त असा आहार हा शरीरात ताकद देतो. यात गोड रसाचे सर्वाधिक प्रमाण असते कारण हा रस पोषण करणारा असतो. त्यानंतर आंबट, तिखट, कडू, तुरट आणि खारट हे रस कमी कमी प्रमाणात असावेत. जरी हे रस कमी प्रमाणात असतात तरी त्याचेही शरीर धातूंच्या जडणघडणीत तितकेच महत्त्व आहे. (हे पुन्हा सविस्तर पाहुयात)
या उलट एकाच रसाने युक्त आहार हा दुर्बलता निर्माण करतो.
आता तुम्ही सांगा की आपल्या आहारात कोणत्या पदार्थात कोणता रस असतो ते? (तुम्ही या पोस्टच्या खाली उत्तर लिहू शकता.)
आहाराचे प्रमाणही आपण आज येथे पाहुयात…
त्रिविधं कुक्षौ स्थापयेदवकाशांशमाहारस्याहारमुपयुञ्जानः; तद्यथा- एकमवकाशांशं मूर्तानामाहारविकाराणाम्, एकं द्रवाणाम्, एकं पुनर्वातपित्तश्लेष्मणाम्; एतावतीं ह्याहारमात्रामुपयुञ्जानो नामात्राहारजं किञ्चिदशुभं प्राप्नोति||चरक संहिता
जर आपण आपल्या कुक्षी म्हणजे पोटाचे अथवा आहार घेण्याच्या प्रमाणाचे ३ भाग केले तर…
(येथे भारतीय रोजच्या जेवणाचा विचार करूयात.)
पहिला भाग – मूर्त पदार्थांसाठी म्हणजेच जे घन पदार्थ आहेत त्यांच्यासाठी असावा. जसे पोळी, भात, भाजी इ पदार्थ.
दुसरा भाग – द्रव म्हणजेच पातळ पदार्थांसाठी असावा. जसे, आमटी, टाक, वरण, कढी, सार, सूप, आणि पाणी.
तिसरा भाग – आहार पचनासाठी मोकळा ठेवावा. आयुर्वेद शास्त्रानुसार आहार पचनाच्या काळात वात, पित्त आणि कफ हे दोष तयार होत असतात; जे पुढे शरीराच्या वाढीसाठी, पोषणासाठी उपयोगी असतात. याच्यासाठी हा तिसरा भाग मोकळा असावा.
म्हणूनच “सावकाश जेवा”…म्हणजेच स अवकाश (थोडी जागा ठेवून जेवा) असे म्हणले जाते…आपण सावकाश जेवा म्हणजे भरपूर जेवा असा अर्थ घेतो आणि पोट तुडुंब भरेपर्यंत ताव मारतो.
असो…
असेही मानले जाते जर एक संपूर्ण वर्तुळ O पकडले तर अर्ध गोल घन आहार, १/४ भाग पातळ आहार आणि १/४ भाग रिकामा ठेवावा. हे आहाराचे प्रमाण हे शरीरासाठी योग्य असते हे प्रत्यक्ष अनुभवातूनच कळते.
आता हे तरी आपल्या शरीराचे प्रमाण बाहेरील माणूस कितीही आहारतज्ज्ञ असला तरी त्यास कसे कळणार?
हे आपणच ठरवायचे असते. मागील भागात सांगितलेली लक्षणे आणि या भागात आहारानुसार सांगितलेले त्याचे प्रमाण यानुसार आपल्या शरीरात पचणारा आहार आपणच ठरवायचा असतो.
क्रमशः…..
आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग ९
आता पाहुयात आहार कधी घ्यावा?
प्रश्न – तुम्ही कधी घेता? अथवा तुम्ही कधी खाता?….
उत्तर – कधीही…समोर तळलेले, चटपटीत अथवा आवडीचे गोड पदार्थ आले की तर आम्हाला लगेच भूक लागते….बरोबर ना? चला तर बघुयात आयुर्वेद काय सांगतो ते….

आयुर्वेदशास्त्र सांगते…
जीर्णेऽश्नीयात्; 
पहिला आहार पचल्यावर पुढचा आहार घ्यावा. म्हणजे कधी हो? आम्हाला तर सारखीच भूक लागते.
त्यामुळे पहिला आहार पचला आहे हे आम्हाला कळतच नाही आणि ते लक्षात घ्यावे हे आम्हाला कोणी शिकवलेच नाही. ना हे शाळेत शिकवले ना कॉलेजमध्ये. जीवनावश्यक गोष्ट असूनही हे शिकवावे असे कोणालाही वाटत नाही. योग्य भूक लागणे म्हणजे काय? हे आम्हाला माहितच नाही. 
नाही खाल्ले तर आम्हाला बेचैनी येते, पोटात गॅसेस होतात, डोके दुखते….. खाल्ले तरीही अनेकवेळा हे होतेच. त्यामुळे आम्हाला शरीरात खरी भूक कधी लागली आहे? हेच कळत नाही.
अन्नग्रहण करण्याची खरी वेळ कधी असते ते आता पाहुयात.
जीर्णे तु स्वस्थानस्थेषु दोषेषु वातानुलोम्यादुत्सृष्टेषु मूत्रपुरीषवेगेषु विशुद्धेषूद्गारहृदयस्रोतोमुखेषु विशदकरणे लघुनि शरीरेऽग्नावुदीर्णे जातायां बुभुक्षायामभ्यवहृतमन्नमप्रदूषयद्दोषानायुर्बलवर्णानभिवर्द्धयति| *केवलं अयमेव कालो भोजनस्य*|| चरक संहिता
पहिले अन्न पचल्यावर
हा आणि हाच केवळ *अन्न घेण्याचा योग्य काळ* आहे. आचार्य चरक ही अगदी जोर देऊन सांगत आहेत…म्हणजे त्याकाळीही किती अजीर्णाचे रुग्ण त्यांना दिसले असतील.
अशा योग्य काळी घेतलेला आहार हा शरीरात दोष न वाढवता सर्व धातूनिर्मिती करून बल, वर्ण आणि ऊर्जा निर्मिती करतो.
पण आम्ही ही अवस्था कधी समजलीच नाही.
जेवणापूर्वी पोट आणि शरीर हलके आहे का? शरीरात कोठेही दुखणे आहे का?…डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी. शरीरात कुठे खाज, कफ, अम्लपित्त आहे का? शरीरात थकवा आहे का? हे असेल तर त्या अवस्थेत घेतलेले अन्न पचणार नाहीये. कारण शरीरात अजीर्ण आहे…. लक्षात घ्या…अम्लपित्त हे ही अजीर्णच असते. तसेच अधिक आहार घेऊन अपचन होऊनही थकवा येऊ शकतो. 
अजीर्णे हि भुञ्जानस्याभ्यवहृतमाहारजातं पूर्वस्याहारस्य रसमपरिणतमुत्तरेणाहाररसेनोपसृजत् सर्वान् दोषान् प्रकोपयत्याशु, l चरक संहिता
अजीर्ण असताना अन्नग्रहण केले (म्हणजेच दोन वेळचे जेवण अथवा मधले खाणे अथवा कोणतेही पेय घेतले) तर पूर्वीचा आहार न पचल्यामुळे त्यात पुन्हा नवीन आहाराची भर पडल्यामुळे सर्व वात, पित्त आणि कफ दोष एकत्र वाढतात आणि अनेक रोग निर्माण करतात असे आचार्य चरक म्हणातात. 


अनेक रुग्णांना केवळ आहाराच्या वेळा आणि प्रमाण कमी/अधिक करून अथवा पथ्यकर आहार घेऊन रोगमुक्त होताना पाहिले की चरकाचार्यांच्या या संशोधनाविषयी विशेष अभिमान वाटू लागतो. 
आता आपल्याला हे वाढलेले दोष आणि वेगवेगळे रोग होणे अपेक्षित आहे? का घेतलेला आहार पचून शरीरात सर्व धातूंचे पोषण होऊन ऊर्जा निर्मिती करायची आहे ते प्रत्येकाने लक्षात घ्यायचे आहे.
मग जर एखादी व्यक्ती भूक नसताना “अरे एवढ्याने काय होते..खा ना.” असे म्हणून अगदी प्रेमाने खायला घालत असेल तर या ठिकाणी त्याला “प्रेम” म्हणायचे का? का येथे प्रेमाची व्याख्या बदलावी असे वाटू लागते. 
क्रमशः…..
आयुर्वेदाच्या नजरेतून….. भाग १०
वसंत ऋतुमुळे रुग्णांच्या शोधनाची(पंचकर्मांची) गडबड असल्याने पोस्टायला उशीर झाला…असो. 
आता यापुढील विचार थोडा अजून महत्त्वाचा आहे.
आयुर्वेदशास्त्र सांगते….
वीर्याविरुद्धमश्नीयात्; (वीर्य अविरुद्ध अश्नियात्)
पदार्थाच्या वीर्याच्या विरुद्ध वीर्याचे पदार्थ एकत्र घेऊ नयेत. सध्याच्या काळासाठी फार महत्त्वाचा विषय असल्याने यावर अधिक विचार करूयात. याच्या अभ्यासाने आपल्या अनेक आजारांवर ज्याची कारणे समजत नाहीत (जसे autoimmune diseases अथवा allergies त्यांवर) आपण केवळ आहारातील बदलाने मात करू शकू.
येथे दोन शब्द आहेत… *वीर्य आणि विरुद्ध*
वीर्य्यं शक्तिः सा च पृथिव्यादीनां यः सारभागः तदतिशयरूपा । शब्दकल्पद्रुम
*वीर्य* याचा एक अर्थ पदार्थातील acting principle म्हणजे पदार्थातील *कार्यकारी शक्ती/गुण*.
येन कुर्वंति तद्वीर्यम् | चरक संहिता
जे द्रव्याचे कार्यकारी तत्व शरीरात राहून शरीरावर परिणाम करते ते वीर्य असते. असे विरोधी कार्यकारी तत्व असणारे पदार्थ एकत्र सतत खाल्ल्यास ते शरीरातील धातूंमध्ये मोठ्या प्रमाणात परिणमन घडवून आणू शकतात. पुढे जाऊन शरीरातील धातूंचे कार्यही बिघडवू शकतात.
पदार्थातील कार्यकारी शक्ती दोन गुणांनी प्रामुख्याने कार्य करते; *उष्ण आणि शीत*; म्हणजे पदार्थ हे शीत किंवा उष्ण असे दोन वीर्यांचे प्रामुख्याने असतात आणि ह्या दोन गुणांनी ते शरीरातील धातूंवर काम करतात. ह्या दोन्ही गुणांचे पदार्थ हे एकत्र खाऊ नये हा सामान्य नियम आहे. उष्ण आणि शीत वीर्य पदार्थ शरीरावर काय काम करतात ते पाहुयात.
तत्रोष्णम् भ्रमतृटग्लानिस्वेददाहाशुपाकिता | अष्टांग हृदय
*उष्ण वीर्य* असणार्या पदार्थाने *शरीरात तहान लागणे, घाम येणे, ग्लानि येणे, चक्कर येणे, आग होणे, लवकर पचन होणे अथवा शरीरात कोथ, पाक होणे* हे होते. उष्ण पदार्थ *वात आणि कफ दोष* कमी करतात.
शिशिरं पुन: | ल्हादनं जीवनं स्तंभं प्रसादं रक्तपित्तयो: | अष्टांग हृदय
तर शीत वीर्य असणार्या पदार्थाने *शरीरात तर्पण/ आल्हाद निर्माण होणे. ते पदार्थ रक्त आणि पित्त कमी* करतात.
दूध, पाणी हे पदार्थ गरम सेवन केले तरी शरीरात जाऊन शीत वीर्याचे असल्यामुळे शरीरावर शीत गुणाने काम करतात. या विरुद्ध तिखट रसाचे पदार्थ जसे मिरची, मिरे, मासे, आंबट अथवा अपक्व फळे इ हे उष्ण वीर्य असतात.
आईस्क्रीम सारखे शीत गुणाचे पदार्थ हे शरीरातील धातूंच्याच विरुद्ध असल्याने शरीरात शीतता निर्माण करून शरीरात स्तंभन करतात. म्हणून blood clotting साठी त्याचा उपयोग केला जातो. या उलट कोलड्रिंक, मद्य हे थंड सेवन केले तरी त्यातील पदार्थांच्या संयोगामुळे ते पदार्थ हे उष्ण वीर्याचे असतात.
म्हणूनच, आयुर्वेदानुसार उष्ण वीर्याचे दही हे शीत वीर्याच्या दुधासोबत खाऊ नये. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तीने दही खाऊ नये. उष्ण दही गरम करू नये………. असे काही नियम दिलेले आहेत.
उष्ण, शीत या बरोबरच अजून काही गुण हे वीर्य स्वरुपात कार्यकारी असतात. त्यांना *अष्टविध वीर्य* म्हणतात. त्यावर पदार्थांचे कार्यकारित्व अवलंबून असते.
“वीर्याविरुद्ध” यातील दुसरा शब्द विरुद्ध हा आहे. पुढील भागात *विरुध्द* ज्याला सध्याच्या भाषेत *Incompatibility* म्हणतात याचा विचार विस्ताराने पाहुयात.
क्रमशः…..