नवरात्री स्पेशल
नवरात्री…भाग १ (अश्विन मासारंभ – अश्विन शुद्ध प्रतिपदा)
आदिमाया शक्ती, देवी दुर्गा, महालक्ष्मी, सरस्वती, महाकाली या साऱ्या स्त्रीतत्वांचे पूजन नवरात्री या सणाच्या माध्यमातून दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत असे १० दिवस केले जाते. स्त्रीतत्वाच्या ९ विविध स्वरूपाचे पूजन याकाळात होत असते. यालाच शारदीय नवरात्र उत्सव असे म्हणतात. माघ, चैत्र, आषाढ,अश्विन या चारही महिन्यात प्रतिपदा ते नवमी पर्यंत स्त्रीतत्वांची पूजा करण्याची पद्धत संपूर्ण भारतवर्षात आहे. त्यापैकी अश्विन महिन्यातील नवरात्री उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.
प्रथमा – शैलपुत्री हे देवी दुर्गा चे प्रथम रूप आहे. पर्वतराज हिमालयाच्या घरात पुत्री रूपात जन्म घेतल्याने तिचे नाव ‘शैलपुत्री’ असे पडले. (शैल – पर्वत)
द्वितीया – ब्रह्मचारिणी l ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी. म्हणून ब्रह्मचारिणी म्हणजे का तपाचे का आचरण करणारी.
तृतीया – चंद्रघंटा अलौकिक ज्ञानप्राप्ती करून देणारी देवी म्हणून हीचे वर्णन पहायला मिळते.
चतुर्थी – कूष्माण्डा अत्यंत पवित्र तथा अचंचल मन असे हिचे रूप मानले गेले आहे.
पञ्चमी – स्कंदमाता मोक्षदायिनी म्हणून ह्या मातेचे वर्णन केले जाते.
षष्ठी – कात्यायनी नवदुर्गा या हिंदू देवी पार्वती (शक्ति) असे हिचे स्वरूप आहे.
सप्तमी – देवी कालरात्रि हिला व्यापक रूपाने देवी – काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, मृत्यू-रुद्राणी, चामुंडा, रौद्री , धूम्रवर्णा, चंडी और दुर्गा अश्या अनेक विनाशकारी रूपांमध्ये मानले जाते.
अष्टमी – महागौरी नारी, शक्ति, ऐश्वर्य तथा सौंदर्याची देवी म्हणून हिचे रूप मानले जाते.
नवमी – सिद्धिदात्री जी सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देते.
असे हे स्त्रीतत्व हे सृष्टीमध्ये कधी महागौरी या रूपात सौम्य तर महाकालीच्या रूपात कठोर, तर कधी सिद्धिदात्री किंवा सरस्वती, चंद्रघंटा या रूपात सिद्धी प्राप्त करून देणारी तर कधी कात्यायनी या रूपात अतिशय शक्ती – ताकदवान असणारी आणि दुष्टांचा संहार करणारी, शैलपुत्री या रूपात कुणाची कन्या तर स्कंदमाता या रूपात कुणाची माता, भगिनी अशी विविध रूपे या दैवी स्त्री तत्वाची मानली जातात.
जशी स्त्रीची दैवी गुणांनी युक्तरूपे आपण जाणतो. तशीच प्रत्यक्ष संसारात स्त्री ही
बाला किंवा कुमारिका/कन्या, तरुणा, गर्भिणी, प्रसूता, माता, प्रौढा, वृद्धा,
या सर्व अवस्थेतून जात असते. नवनिर्मिती अथवा नव जीवन देऊ शकणारे हे स्त्रीतत्व गर्भिणी, प्रसूता, माता
या काही विशिष्ठ अवस्थाही यशस्वीपणे स्वतःमध्ये सामावून घेते. या काही अवस्था सोडल्या तरी प्रत्येक स्त्रीला बाकी सर्व अवस्थांमधून जावेच लागते आणि शेवटी सामाजिक समानतेचा विचार सोडला तरी शारीरिक स्तरावर स्त्रीतत्व हे पुरुषतत्वापेक्षा वेगळे आहे हे सुद्धा लक्षात घ्यावे लागते. स्त्रीतत्व हे ही पुरुषतत्वाइतकेच धीर, गंभीर, स्थिर असू शकते आणि वैचारिक क्षमतेतही तितकेच प्रगल्भ असते हे ही आपल्याला अनेक उदाहरणातून दिसून येते.
संसारातील या स्त्रीतत्वा ची आरोग्याच्या दृष्टीने ओळख आपण पुढील ९ दिवस नवरात्रीच्या या सणाच्या निमित्ताने करून घेऊयात. आयुर्वेदात याचा कसा विचार झाला आहे, ते ही समजून घेऊयात. त्या निमित्ताने काही स्त्री रोगांची माहितीही जाणून घेऊयात. या बरोबरच स्त्रीतत्वाची विविध वैशिष्ट्यही समजून घेऊयात.
नऊ दिवसांच्या या कल्याणकारी आणि मांगल्यानी युक्त अश्या नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! तसेच संसारातील अश्या सर्व स्त्रीतत्वांना शतशः प्रणाम l
क्रमशः…..
नवरात्री…भाग २ (अश्विन शुद्ध द्वितीया)
बाला/कुमारिका वय ० ते १६ वर्ष (सध्या १०-१२ वर्ष??) मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीचा काळ
जन्मलेल्या बालिकेचे लसीकरणानेच स्वागत करणारी सध्याची आपली पिढी शरीरात व्याधिक्षमता ही केवळ त्या टोचण्यानेच निर्माण होते असे मानत आहे,….असो. आपला आजचा विषय हा नाही. बालिकेचा जन्म तिची होणारी शारीरिक वाढ, तिला होऊ शकणारे आजार आणि त्यावरील उपाय यांचा विचार आज करूयात.
आयुर्वेदशास्त्र सांगते, कोणतेही बालक जन्माला आल्यावर त्यास जातकर्म करावे. मध, तूप यामध्ये सुवर्ण उगाळून बालकास चाटवावे. अरे बापरे ! ही तर अशक्यच गोष्ट आहे, नाही का? कारण आधुनिक शास्त्रात असे विचार नाहीत…आणि आपण त्या शिवाय वेगळा विचारच करू शकत नाही….तरीही आयुर्वेद शास्त्र सांगते…सुवर्ण हे विष आणि जंतुनाशक; तर मध हे कफनाशक आहे. जन्मलेल्या बालकाच्या घशात अडकलेला कफ याने दूर होतो. त्यामुळे पुढे दुधाचा मार्ग मोकळा होतो. गायीचे शुध्द तूप हे भूक वाढवणारे आहे. तर असे हे सुवर्णप्राशन ब्राह्मी, शंखपुष्पी सारख्या वनस्पतींच्याबरोबर बाळाला दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर दिल्यास बालकाचा शारीरिक आणि बौध्दिक विकास चांगला होतो असे वर्णन बालरोग ही विशेष शाखा वर्णन केलेल्या काश्यपसंहितेत आहे. त्याबरोबरच काही वनस्पती जसे काकडशिंगी, वेखंड, जेष्ठमध, बाळहिरडा, सुंठ आणि इतर असे दुधामध्ये उगाळून रोज त्या बाळाला गुटी दिल्यास त्याचा उपयोग व्याधिक्षमता निर्माण होण्यासाठी होत असतो.
० ते ३० वर्षांपर्यंत बालकांचे सर्व धातू वाढत असतात. कुमारिका/कन्या असलेल्या या बालिकेमध्येही शारीरिक, मानसिक, आणि वैचारिक वाढ होण्यास सुरुवात होत असते.
तत्र बालमपरिपक्वधातुमजातव्यञ्जनं सुकुमारमक्लेशसहमसम्पूर्णबलं श्लेष्मधातुप्रायमाषोडशवर्षं, विवर्धमानधातुगुणं पुनः प्रायेणानवस्थितसत्त्वमात्रिंशद्वर्षमुपदिष्टं;…….ll चरक संहिता
१२ वर्षांपर्यंत बालक आणि बालिका यांच्या शरीराची रचनात्मक दृष्टीने काही प्रमाणात समान वाढ होत असते. लहान मुलामध्ये धातू हे अपरिपक्व असतात. त्यांच्यात सर्व शरीर घटकांची लक्षणे तयार झालेली नसतात, म्हणजेच बलिकेचा विचार केला तर स्त्रीतत्वाची सर्व लक्षणे अजून पूर्णपणे तयार झालेली नसतात. शरीर धातू हे नाजूक असतात. या काळात शरीरात प्राय: कफ दोषाचे आधिक्य असते. कफ धातू हा शरीराची जडण घडण करणारा असल्याने तो या काळात अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे शरीरातील धातू हे विवर्धमान अवस्थेत असतात म्हणजेच शरीर धातूंची वाढ होत असते. सत्व/चित्त म्हणजे मन मात्र अनवस्थित म्हणजे चंचल असते. आपण सध्या ऑटीझम या रोगाची खूप चर्चा ऐकतो. ही मुले खूप एकलकोंडी असतात अथवा खूप चंचल असतात. या ठिकाणी आपण त्यांच्या मानसिक चांचल्याचे कारण शोधणे आवश्यक आहे. तसेच ती अक्रियाशीलता किंवा चंचलता वयामुळे आहे का काही घरातील परिस्थितीमुळे आहे याचा विचार होणे आवश्यक आहे.
या काळात मुले अनुकरणशील असतात. आई, वडील, आजी, आजोबा, शिक्षक, मित्र मैत्रिणी या सर्वांच्या वागण्याचा प्रभाव त्यांच्यावर पडत असतो. त्यामुळे बालिकेचा मानसिक अथवा वैचारिक विकास योग्य होण्यासाठी तिच्यासमोर सतत असणाऱ्या व्यक्तींचे व्यवहार योग्य असणे आवश्यक आहे.
क्रीडनकानि खलु कुमारस्य विचित्राणि घोषवन्त्यभिरामाणि चागुरूणि चातीक्ष्णाग्राणि चानास्य प्रवेशीनि चाप्राणहराणि चावित्रासनानि स्युः||काश्यप संहिता
बालकाची खेळणी कशी असावीत? या विषयावरही ग्रंथकारांनी आपले मत दिले आहे. यावरून दैनंदिन जीवनात शारीरिक सुदृढते बरोबरच मानसिक संपन्नतेचा विचार ही आयुर्वेदात व्यक्त होतो असे दिसते.
या काळात बालिकेला मिळणारा आहार पौष्टिक तर हवाच पण त्याबरोबरच तो योग्य प्रमाणात आणि शरीरासाठी हितकर हवा. तसे नसेल तर त्याचा परिणाम तिच्या सर्व अवयवांबरोबरच तिच्या स्त्री विशिष्ठ अवयावांवरही प्रामुख्याने होत असतो. अनेकवेळा अधिक आहाराच्या सेवनाने आणि त्याला न मिळणाऱ्या व्यायामामुळे स्थूलता निर्माण होऊन विविध व्याधी तर निर्माण होतातच त्यापुढील वयात प्रजनन क्षमता आणि तत्संबंधी अवयवांत बिघाड झाल्याचे दिसून येते.
सध्या घेतल्या जाणाऱ्या आहार विहार यामुळे बाला किंवा कुमारिका ही अवस्था १२ वर्षाच्या ऐवजी ८ ते १० वर्ष यावर आलेली दिसते. ह्या विषयी पुढील भागात सविस्तर बोलुयात.
निरागसता हे या काळातील वैशिष्टय आहे. त्यातून निर्माण होणारी उत्सुकता(curiosity) आणि सृजनशीलता(creativity) ही या काळात पल्लवित करणे हे समाजाचे कर्तव्य आहे.
याच काळापासून बालिकेच्या स्त्रीतत्वाची जडणघडण सुरू होते आणि एक सुंदर कळी उमलून तिचे रुपांतर हळूहळू फुलात व्ह्ययाला लागते.
क्रमशः…..
नवरात्री…भाग ३ (अश्विन शुद्ध तृतीया)
नवरात्री…भाग ३…..तरुणा १६ ते ३० वर्ष
आता कुमारिका ही अवस्था ओलांडून ही बाला तारुण्यामध्ये प्रवेश करू लागते. ह्या वयालाच मध्य वय असे ग्रंथकार मानतात. खरेतर हे ६० वर्षांपर्यंत मानले आहे. पण आज आपण ३० वर्षांपर्यंतच्या बालिकांचा विचार करूयात.
मध्यं पुनः समत्वागतबलवीर्यपौरुषपराक्रमग्रहणधारणस्मरणवचनविज्ञानसर्वधातुगुणं बलस्थितमवस्थितसत्त्वमविशीर्यमाणधातुगुणं पित्तधातुप्रायमाषष्टिवर्षमुपदिष्टम्; ll चरक संहिता
या वयात स्त्री शरीरात स्त्रीतत्त्वांची जाणीव व्ह्यायला सुरुवात होते. आतापर्यंत सर्वांमध्ये चढा-ओढीने बोलणारी, वागणारी, सर्वांमध्ये मिसळणारी ही बाला हळूहळू स्वतःमध्ये होणारे शारीरिक, मानसिक बदल समजायला लागते. पुरुषापेक्षा आपल्यामध्ये… ”कुछ तो खास है l” ही विशेष जाणीव तिला होऊ लागते.
आयुर्वेदशास्त्रानुसार या काळात शुक्रधातूची वाढ होऊन त्याचे कार्य अधिक्याने दिसायला लागलेले असते. त्यामुळे शरीरात बल, वीर्य, पौरुषत्व, पराक्रम वाढायला लागतो. त्यामुळेच शरीरातील धातूंची पुन: निर्मिती (प्रजजन) शक्य होते; तसेच वरील मानसिक भाव दिसत राहतात. त्या शुक्रधातुमुळे शारीरिक आणि मानसिक बळ वाढते. बौध्दिक ग्रहण, धारण आणि स्मरण क्षमता वाढू लागते. मानसिक स्वस्थता/प्रगल्भता या वयात प्राप्त होऊ लागते. शरीरातील धातू आता अधिकाधिक वाढू लागतात.
या काळात गर्भाशय, स्तन, बीजग्रंथी या अवयावांची वाढ वेगाने होऊ लागते. या काळात जर वात वाढवणारा आहार सेवन केला गेला तर वाताच्याच स्थानात असणाऱ्या या अवयवांची वाढ चुकीच्या पद्धतीने होते. त्यामुळे पाळीच्या संदर्भातील आजार होऊ लागतात. सध्या PCOD अथवा पाळीच्या संदर्भात होणारे अनेक आजार – जसे पाळी उशीरा येणे, पाळीच्या वेळी त्रास होणे, पाळी लवकर येणे, किंवा अधिक प्रमाणात येणे. या सर्व गोष्टी ह्या घेण्यात येणाऱ्या आहार आणि विहार यावर अवलंबून असतात. त्यामुळे या काळात आणि यापुढेही वातास जपणे आवश्यक आहे. बटाटा, पावटा, वाटाणा, चणा, मैदा यांसारखे शरीरात रुक्षता निर्माण करणारे पदार्थ शरीरात वायु वाढवतात. त्यांचे सेवन योग्य प्रमाणात होणे आवश्यक आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाताना आणि स्वतःचे करियर घडवताना दिसत आहे. परंतु हे करत असताना आपल्या शरीराचे जे महत्त्वाचे अवयव आहेत त्यांच्याकडे ती सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे; हे ही लक्षात येते. शरीरातील अवयवांची ताकद/बल हे शरीराला मिळालेला सुरुवातीपासूनचा आहार आणि व्यायाम तसेच मानसिक अवस्था ह्यावर अवलंबून असतात. प्रत्येक स्त्रीमध्ये शारीरिक ताकद वेगवेगळी असू शकते. ह्याचा विचार स्वतः स्त्रीने आणि तिच्याबरोबर असणाऱ्या नातेवाईकांनी स्त्रीचे करियर ठरवताना करणे आवश्यक आहे.
रसादेव स्त्रिया रक्तं रजःसञ्ज्ञं प्रवर्तते |
तद्वर्षाद्द्वादशादूर्ध्वं याति पञ्चाशतः क्षयम् || सुश्रुत संहिता
आयुर्वेदात मासिक पाळी सुरू होण्याचा काळ हा फार पूर्वीपासून १२ वर्ष मानला आहे. परंतु आज काल लहान मुलींमध्ये ८-१० वर्षापासूनच रजप्रवर्तन सुरू होते. सध्या असे दिसते की, ज्या मुलींना ही पाळी १३-१४ वर्षांपर्यंत सुरू होत नाही त्या माता “मुलीला महिना सुरू झाला नाही” हे विचारायला येतात. पण ज्यांना ८-१० व्या वर्षीच मासिक पाळी सुरू झाली आहे, त्यांच्या माता मात्र हे Normal आहे असे मानून शांत असतात. अजबच आहे सर्व ………..
पाळी लवकर सुरू होण्यामागे अधिक प्रमाणातील आहार आणि शारीरीक स्थूलता महत्त्वाचे आहे; तितकीच सामजिक माध्यमेही (social media) ही जबाबदार आहेत. समाजात ज्या गोष्टी घडत असतात, मुलांना सतत दिसत असतात त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर ही होत राहतात, असे दिसून येते.
याकाळात या वरील सांगितलेल्या सर्व बदलांमुळे स्त्री शरीरात नाजूक भाव निर्माण होतो. स्त्रीचे सौंदर्य हे या काळाचे वैशिष्ट्य असते. त्याने तिचे शरीर हळूहळू सुडौल दिसू लागते.
पुढील काही अवस्था या ० ते ६० म्हणजेच मध्यवयातील आहेत. त्या स्त्रीतत्वाचे उच्चांक दाखवून देणाऱ्या आहेत. त्यामुळेच ह्या काळापर्यंत स्त्री अवयवांची जडणघडण योग्य होऊन त्यांचे कार्य चांगले सुरू राहणे आवश्यक असते.
क्रमशः…..
नवरात्री…भाग ४ (अश्विन शुद्ध चतुर्थी)
अपत्यकांक्षी – मूल होण्याची इच्छा असलेली
विवाह हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा बदल (टर्निंग पॉइंट) असू शकतो. मिळणारे सासर हे स्त्रीला कसे समजून घेते, या बरोबरच ती स्त्री, सासरच्या सर्व व्यक्तींना कशी समजून घेते, यावर तिचे पुढील आयुष्य अवलंबून असते.
या काळात स्त्रीचे स्त्रीत्व हे सर्व नात्यांमधून सिद्ध होऊ लागते. पत्नी, सून, मुलगी, बहीण, नणंद, जाऊ या सर्व भूमिकेतून जाताना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नातेसंबंधांची जपणूक करत असताना अथवा त्यांना दूर लोटत असताना समाधान किंवा वेदना यापैकी तिच्या वाट्याला काय आहे किंवा ती घरात वावरत असताना कशाला महत्त्व देते यावर तिचे आणि तिच्या दोन्ही घरातील व्यक्तींचे भविष्य अवलंबून असते आणि त्यावर तिच्या शरीरातील स्त्रीतत्व खुलते अथवा कोमेजते.
अपत्यकांक्षी स्त्रीला आवश्यक आहे; की अपत्य हे तिच्या प्रजनन काळातच व्ह्यायला हवे. आजकाल आधुनिक शास्त्राच्या प्रगतीमुळे ४० वयानंतरही गर्भधारणा अथवा प्रसूती दोन्ही शक्य असले तरी ती नैसर्गिक होणे सहज शक्य नसते. आधुनिक शास्त्राद्वारे केल्या जाणाऱ्या IUI, IVF,…. इ अनेक प्रयत्नांनंतर काहींना यश मिळते. त्यामुळे साधारणत: २५ ते ४० या वयातच गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न होणे इष्ट ठरते. आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भधारणा होत नसल्यास औषधी चिकित्सा, अथवा पंचकर्म चिकित्सा केली जाते. त्याचे फायदे पुढील भागात पाहुयात.
सध्या वयाच्या तीशीपर्यंत शिक्षणच संपत नसल्याने गर्भधारणेचे नैसर्गिक शिक्षण बंदच पडायला लागले आहे. अपत्याची ईच्छा असली तरी त्या अपत्याच्या पालनाची जबाबदारी, त्याच्या प्राप्तीनंतर शरीरात होणारे बदल आणि आपत्यप्राप्तीसाठी द्यावा लागणारा वेळ यासर्वांमुळे सध्याची पिढी यापासून दूर होत चालली आहे. त्यातून लिव्ह इन रिलेशनशिप अथवा विवाह बंध नको असलेल्या व्यक्ती यांच्याबाबतीत तर हे विचार नसातातच.
अजून तरी मानवापासूनच मानवाची उत्पत्ती होत असल्यामुळे सध्यातरी मानव जात टिकवायची असेल तर आपले प्रयत्न चालू ठेवणे आवश्यक आहे आणि ९ महिने बालकाच्या पोषणासाठी अजून तरी स्त्री शरीराचा आधार घ्यावा लागत असल्याने तिच्या शरीरातील प्रजनन अवयव हेही समाज टिकवण्यासाठी गरजेचे आहेत.
पण सध्या स्त्रीच्या मनातूनच अपत्य प्राप्तीच्या विचारांना टाळा लागल्याने आणि त्याबरोबरच अहितकर गोष्टी म्हणजे आहार विहार यांच्या सेवनाने सध्या pcod, fibroid, यांसारख्या व्याधींना घर मिळालेले दिसत आहे.
ध्रुवं चतुर्णां सान्निध्याद्गर्भः स्याद्विधिपूर्वकम् ।
ऋतुक्षेत्राम्बुबीजानां सामग्र्यादङ्कुरो यथा ll सुश्रुत संहिता
जसे एखादे झाड फळावे अथवा फुलावे यासाठी योग्य ऋतु असावा लागतो (काही झाडे ही त्या त्या ऋतुतच येतात.) झाड वाढण्यासाठीनांगरलेली, सुपीक जमीन आवश्यक असते. ज्या जमिनीत हे धान्य अथवा झाड येते त्या जमिनीला पोषक नंगरलेली जमीन तयार करून घ्यावी लागते. यालाच क्षेत्र असे म्हणतात. तर बीज जमिनीत योग्य पेरल्यानंतर ते व्यवस्थित रुजावे यासाठी जमिनीत पोषक घटकही आवश्यक असतात. तसेच पोषक घटक धान्याच्या मुळापर्यंत पुरवण्यासाठी पाणी/अम्बु या माध्यमाची गरज असते. आणि हे सर्व जरी योग्य असले तरी जर बीज मुळात दूषित असेल; प्रजननक्षम नसेल तर धान्य पिकतच नाही.
गर्भधारणा होण्यासाठी ही असेच ऋतु म्हणजे ऋतुकाल – स्त्री मध्ये होणारे मासिक रजप्रवर्तन आणि प्रत्येक मासात तिच्यात होणारे बदल, क्षेत्र म्हणजे गर्भाशय आणि त्याचे आरोग्य, अम्बु म्हणजे स्त्रीने घेतलेला आहार जो नंतर गर्भिणी काळात बालकाला मिळणार असतो म्हणजेच स्त्रीचे लहानपणापासून झालेले पोषण, बीज म्हणजे स्त्री आणि पुरुष बीज आवश्यक असते.
हे चारही घटक जर सुस्थितीत असतील तरच गर्भधारणा व्यवस्थित होते. सर्व शरीरस्वास्थ्याचा विचार आयुर्वेद मांडतो. अपत्यप्राप्तीसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचे शरीर सुदृढ सशक्त असणे आवश्यक आहे. जर ते असेल तर प्रजननासाठी लागणारे हॉर्मोन्स योग्य प्रमाणात तयार होतातच.
याबरोबर स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मनात अपत्यप्राप्तीच्या भावना असणे आवश्यक आहे. मनातील सुप्रजननाची इच्छा हा भाव या काळात महत्त्वाचा असतो आणि तो स्त्री पुरुष दोहोंमध्ये एकत्रच असावा लागतो.
आयुर्वेदामध्ये गर्भधारणा होण्याच्या पूर्वीपासूनच गर्भसंस्कार सांगितलेले आहेत. त्यामध्ये शरीराच्या संपूर्ण शुद्धीपासून ते बीज रुजून अपत्यप्राप्ती होईपर्यंत आणि त्यानंतरही अपत्य परिपालन या सर्वांवर विचार केला जातो. अपत्य होत नसलेल्या जोडप्याने शरीर शुद्धी(पंचकर्म) करून घेतल्यास गर्भधारणा होण्यासाठी खूपच मदत होते असे दिसून येते.
क्रमशः…..
नवरात्री…भाग ५ (अश्विन शुद्ध पंचमी)
गर्भिणी – गर्भधारणा झालेली स्त्री. हिलाच “दौहृदा“ – दोन हृदय/जीव असलेली असे म्हणले आहे.
सौमनस्यं गर्भधारणानाम् l चरक संहिता
”सौमनस्य“ म्हणजे मनाची सुकुमारता, स्नेह भाव, प्रेम भाव हा भाव हे या काळाचे वैशिष्ट्य आहे. असा स्नेह भाव असेल तर गर्भ खूप छान वाढतो. अतिशय काबाड कष्ट सहन करणाऱ्या स्त्रीला आहार मिळत नसेल तरी तिच्यामध्ये गर्भधारणा व्हावी ही इच्छा असेल; तसा स्नेहभाव असेल तरी गर्भ राहतो आणि तो चांगला वाढतो. हे प्रत्यक्ष दिसून येते. मात्र हा भाव नसेल तर अपत्यप्राप्ती, गर्भधारणा अथवा राहिलेला गर्भ शरीरात टिकून राहणे अवघड होते. सध्याच्या वाढलेल्या(Infertility) अनपत्यते मागे हे कारण असू शकते का? याचा विचार होणे आवश्यक आहे. दिवसभरातील कामाची धडपड, सतत स्पर्धेच्या जगातील चढाओढ यांमुळे शरीरात आणि मनातील सुकुमारता केव्हाच नष्ट होते. पैशासाठी काम आणि त्यासाठी जीवाची तगमग यांमुळे शरीरात रुक्ष भाव अधिक निर्माण होऊ लागला आहे.
गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीवर दोन जीवांची जबाबदारी येते. त्या जबाबदारीची जाणीव प्रथम महिन्यापासूनच व्ह्यायला हवी. या काळात स्त्रीने आपले स्वतःचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या काळात स्त्रीला होणाऱ्या आजारांमुळे स्त्रीशरीरात जे दोष निर्माण होतात त्याचे परिणाम गर्भावर होत असतात. जर गर्भावस्थेत स्त्री शरीरात दोष मोठ्याप्रमाणात असतील; तर त्याच दोषांची संगती घेऊन जन्मलेले बालक दीर्घकाळपर्यंत रोगी राहू शकते. त्यासाठीच झालेल्या आजारांवर आपण कोणती औषधे घेत आहोत, त्यांचे गर्भावर काय परिणाम होऊ शकतात हे स्त्रीने लक्षात घेणे आवश्यक आहे.
यासाठी ९ महिने गर्भिणीचा आहार कसा असावा हे आयुर्वेद सांगतो. त्याचबरोबर ९ महिन्यांमध्ये जर गर्भिणीला काही विशिष्ट आजार झाले तर त्यासंदर्भातही चिकित्सा आयुर्वेदात दिलेली आहे.
गर्भिणी तीक्ष्णौषधव्यवायव्यायामवर्जनीयानाम् l चरक संहिता
गर्भिणीला तीक्ष्ण औषध, मैथुन (शरीर संबंध), व्यायाम हे वर्ज्य करायला सांगितले आहे.
आजकाल लोकांना काही आधुनिक आणि आयुर्वेदीक औषधे स्वतःहून डॉक्टर अथवा वैद्यांना न विचारता घ्यायची सवय लागली आहे. अशी औषधे मग अगदी तापाचे औषध का असेना; ही गर्भावस्थेत घेतली गेली तर त्याचे वाईट परिणाम गर्भावर होऊ शकतात. गर्भधारणा न होणे, अवयव दुष्टि होणे, अकाली गर्भस्त्राव होणे, गर्भपात होणे तसेच गर्भाच्या मानसिक भावातही बदल होणे यापैकी काहीही होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे औषधे ही सौम्य आणि कमीत कमी घ्यावी आणि ती ही वैद्यकीय सल्ल्याने घ्यावीत.
सध्या सर्वच गोष्टीत कृत्रिमता आलेली असल्याने प्रसूतीही नैसर्गिक होतच नाही. आजकाल केवळ बोटावर मोजण्याइतक्या बायकांमध्ये प्रसूती ही नैसर्गिक होते असे दिसते. गर्भावस्थेत स्त्री शरीरात बरेच बदल होत असतात. नैसर्गिकरीत्या झालेल्या प्रसूतीनंतर स्त्रीशरीर आपोआप पुन्हा स्वस्थितीत येण्यास मदत होते. C section नंतर ते पुन्हा प्राकृत अवस्थेत येण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात असे दिसते.
प्रसूती कशीही होवो, बालक जन्माला आले की स्त्री मधील पूर्वीची निरागसता अथवा अल्लडपणा कमी होऊन आपोआपच एक जबाबदारीची जाणीव तिला होऊ लागते.
क्रमशः…..
नवरात्री…भाग ६ (अश्विन शुद्ध षष्ठी)
प्रसूता – बालकाच्या जन्मानंतरचे स्त्रीरूप.
प्रसूती कशीही होवो…नैसर्गिक अथवा कृत्रिम… ”सहिष्णुता“ – सहनशीलता हा अजून एक स्त्रीचा अलंकार आहे. या काळात हा भाव व्यक्त होत असतो. गर्भारपणात आणि प्रसूती काळात हा भाव स्वाभाविकपणे व्यक्त होत राहतो. अनेक स्त्रियांचा हा मूळ स्वभाव ही असतो.
भारतामध्ये फार पूर्वीपासून प्रसूतीसाठी वेगळी खोली/घर अशी व्यवस्था होती. तिथेच प्रसूतीपूर्व अवस्थेत स्त्रीला ठेवलेले असायचे. तिची काळजी घ्यायला अनेक स्त्रिया असायच्या. तिला १ ते दीड महिना बाळासोबतच ठेवले जायचे. पथ्यकर आहार दिला जायचा. त्यामुळे, आपोआपच तीला स्वतःकडे आणि बाळाकडे लक्ष देण्यासाठी भरपूर वेळ मिळायचा. त्यामुळे बाळासोबतचे तिचे संबंध दृढ (bonding) होत होते.
आजकालची स्त्रीही प्रसुतीनंतर 15 दिवसात कामाला लागते. बाहेरच्या देशात तर दोन दिवसाच्या बाळाला घेऊन बाहेरही पडतात. भारतात दीड महिन्याची maternity जेमतेम मिळते, त्यामुळे त्या तान्ह्या बालकाला कसे सांभाळायचे ? आपली माणसे घरात नसतील तर त्याला कोणाकडे सोपवून कामाला जायचे ? का त्याला पाळणाघरात ठेवायचे ? हे सर्व प्रश्न आजच्या स्त्रीपुढे आहेत. या सर्व गोष्टींचा तिच्या शरीरावर जो ताण या काळात निर्माण होतो त्याचे परिणाम तिला पुढे आयुष्यभर भोगावे लागतात.
ज्याप्रमाणे तळहातावर फोड आला तर आपण जपतो अथवा एखादी जखम झाली तर ती खूप जपावी लागते. त्यात कोथ (Infection) होऊ न देणे; त्यावर धूळ, घाण बसू न देणे हे सर्व केले जाते. प्रसूती ही अवस्था अशीच नाही का हो ? स्त्री शरीरातील एका विशिष्ठ भागातून नैसर्गिक अथवा कृत्रिम(C section) पद्धतीने बाळ जन्माला आले आहे आणि आता ती गर्भाशयातील जखम भरून येणे गरजेचे आहे. त्यासाठी काळजी घेणे आवश्यक नाही का ? मग ती स्त्री कोणत्याही देशातील असो अथवा प्रसूती कोणत्याही देशात होवो…. पण सध्या करियर आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण यामुळे प्रसूतीनंतर अनेक स्त्रिया स्वतःची काळजी घेताना दिसत नाहीत.
गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीराचा आकार खास करून तीचे मणके vertebral region आणि कटी प्रदेश pelvic region यात बरेच बदल झालेले असतात. प्रसूतीनंतर ते पुन्हा आपल्या जागी येण्यासाठी आपल्याकडे सर्वांगाला तेल लावणे आणि गोवाऱ्यांच्या अग्निने त्यावर वेखंड,ओवा घालून वाफ घेणे हे सांगितले आहे. नैसर्गिक अथवा कृत्रिम (कोणतीही शस्त्रक्रिया केल्यानंतर) प्रसूतीनंतर शरीरात वात दोष वाढतो. तो वात दोष कमी करण्यासाठी शरीरावर तेल लावणे आवश्यक असते. त्याने शरीराचे बलही चांगले वाढते. तसेच त्यावर अग्निद्वारे स्वेद (वाफ) घेतल्याने त्याचा परिणाम आतील अस्थिधातूपर्यंत पोहोचतो आणि तो धातू बळकट होतो. असे केलेल्या स्त्रियांमध्ये पुढे अस्थिक्षय D3 deficiency, osteoporosis होण्याची शक्यता कमी असू शकते. याचा विचार होणे आवश्यक आहे. या सर्व उपक्रमामुळे स्त्री शरीर पुन्हा एकदा प्राकृत स्थितीत येण्यास मदत होते. परंतु आजकाल तेलाची allergy च्या नावाखाली काही केले जात नाही. मुळात allergy कशामुळे होते याचे ज्ञान allergy चे निदान करणाऱ्यांनाही नसते. त्यामुळे या सर्व भानगडी होतात …असो.
याकाळात बालकाला दूध पाजण्यासाठी स्तनांची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. दूध येण्यासाठी स्तन्यवर्धक – दूध वाढवणारे पदार्थ आणि औषधे यांचे सेवन करायला हवे.
प्रसूतीनंतर जर बालिका जन्मास आली, तर पुन्हा बालिकेच्या सर्वांगाची वाढ ही इथूनच सुरू होणार आहे. त्यामुळे मातेने घेतलेल्या आहार आणि विहारावरच तिची प्रकृती निश्चित होणार आहे. तिचा स्वभाव, तिची वागणूक, तिची शरीरयष्टी ही इथूनच घडणार आहे.
प्रथमच बालकाला जन्म दिलेल्या स्त्रीला आता मातृत्व प्राप्त झालेले असते.
क्रमशः…..
नवरात्री…भाग ७ (अश्विन शुद्ध सप्तमी)
प्रौढा – ४० ते ६० वय (रजोनिवृत्तीचा काळ)
ह्या काळात सुरुवातीला मासिक रजोनिवृत्ती होत असते. अनेक स्त्रियांना आजकाल या काळात रजोनिवृत्तीचे आजार (Menopausal Syndrome) होतो. नेहमीच्या मासिक पाळीच्या वेळा बदलणे, शरीरात उष्णता निर्माण होणे (Hot Flushes), हातापायांची आग होणे, रजस्राव खूप मोठ्या प्रमाणात होणे वा कमी होणे, वा न होणे.
SSM आयुर्वेद तर्फे आम्ही मागच्या वर्षी काही शहरी आणि काही गावाकडील या वयातील स्त्रियांना या संदर्भात प्रश्न विचारून त्यांचे विश्लेषण (Analysis) केले. जवळजवळ ८०% स्त्रियांना रजोनिवृत्तीचे आजार (Menopausal Syndrome) त्रास आहे. त्यांना प्रश्न विचारला होता की ”असे होणे तुम्हाला योग्य वाटते का?” ६०% स्त्रियांनी त्याचे उत्तर ”हो“ असे दिले. याचा अर्थ असा की आता या वयात हे रोग होणारच हे आपण गृहीत धरायला लागलो आहोत का? आणि नाही झाले की सतत Investigation करून मला रोग झाला का ? का नाही झाला ? हे बघणार आहोत का ? का स्वतःमध्ये अथवा जीवनशैलीत काही बदल करणार आहोत ?
मासिक पाळी ही केवळ स्त्री शरीरात प्रजननासाठी नसून ती स्त्री शरीराचे रक्षणही करत असते. एक प्रकारे स्त्री शरीराची शुद्धी या मासिक रजप्रवर्तनाने झाल्याने Diabetes, Hypertension यांसारख्या अनेक आजारांपासून स्त्रीचे संरक्षण होत राहते, असे आधुनिक शास्त्रानेही सिद्ध केलेले आहे. मात्र आजकाल अनेक स्त्रियांना रजोनिवृत्ती पूर्वीही काही आजार झालेले दिसून येतात. यामागेही पुन्हा त्यांनी या पूर्वीच्या काळात घेतलेला आहार, विहार, त्यांची जीवनशैली, आणि शारीरिक मानसिक अस्वस्थता कारणीभूत असते.
रजोनिवृत्तीच्या काळात काहीना गर्भाशय ग्रंथी (Uterine Fibroid) होतात. यामुळेही पाळीत बदल होतात, अधिक रजस्राव होतो. यासाठी मग गर्भाशय निर्हरण शस्त्रकर्म करावे लागते. आयुर्वेद औषधोपचार, पंचकर्म जर या काळापूर्वी अथवा या काळात केले गेले तर या सर्व अवस्थांमधून शस्त्रकर्म न करताही अनेक जणींना उपशय मिळतो, हे दिसते.
काही जणींना या काळात थायरॉईड हा आजार होतो. मानसिक अस्वस्थता हे या आजाराचे वैशिष्ठ्य आहे. सकाळी एक गोळी घेतली की आपण या आजारापासून दूर आहोत असा अनेक जणींचा समज असतो. पण त्या गोळीचे आणि त्या आजाराचे परिणाम शरीरावर होतच राहतात. मुळात हा आजार का निर्माण झाला? हे शोधणे आवश्यक आहे. त्यानुसार चिकित्सा घेणे गरजेचे आहे.
PCOD, फायब्रॉइड, रजोनिवृत्तीचे आजार (Menopausal Syndrome) या बरोबरच स्तन प्रदेशातील अथवा गर्भाशयातील कॅन्सर हे आजार या काळात होऊ शकतात. आधुनिक शस्त्रकर्म, रसायन चिकित्सा (chemotherapy), Radiation यांसह आयुर्वेद चिकित्सा दिल्यास या आजारांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. Chemo/Radio ने होणारे त्रास (side effects) कमी होतात. आजकाल संपूर्ण आयुर्वेद चिकित्सेनेही या आजारांवर चिकित्सा देता येते. आजार पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून पंचकर्म करता येते.
प्रगल्भता (Maturity) हे या काळाचे वैशिष्ठ्य आहे. प्रगल्भतेमुळे निर्माण होणारा आत्मविश्वास हा याकाळात दिसून येतो. त्यामुळे स्त्रीचे सौंदर्य या काळात अजून खुलते.
क्रमशः…..
नवरात्री…भाग ८ (अश्विन शुद्ध अष्टमी)
वृद्धा (६० -१०० वर्षाच्या पुढचा काळ)
अतः परं
हीयमानधात्विन्द्रियबलवीर्यपौरुषपराक्रमग्रहणधारणस्मरणवचनविज्ञानं भ्रश्यमानधातुगुणं वायुधातुप्रायं क्रमेण जीर्णमुच्यते आवर्षशतम्| चरक संहिता
प्रगल्भता प्राप्त झालेली ही प्रौढा आता हळूहळू वृद्धावस्थेकडे जाऊ लागते. ह्या काळात वात दोष अधिक्याने वाढत असतो. त्यामुळे, या अवस्थेत शरीरातील धातू हे हळूहळू क्षीण होऊ लागतात. इंद्रियांचे बल खास करून ज्ञानेंद्रिये दुर्बल होऊ लागतात. डोळ्यांनी कमी दिसणे, ऐकू कमी येणे, कार्यक्षमता कमी होणे, लवकर थकवा येणे, ग्रहणशक्ती (कोणताही विषय समजून घेण्याची ताकद) कमी होणे, विषय समजला तरी त्यावर कार्य करण्याची ताकद कमी होते, स्मृती कमी होऊ लागते, बोलण्याची ताकद कमी होते. धातूंची कार्यकारी क्षमता कमी होते, शरीर जीर्ण/क्षीण होऊ लागते. शरीरावर सुरकुत्या पडू लागतात.
वात दोष वाढत असल्याने शरीरात वाताचे रोग वाढू लागतात. सांधे दुखी, कंबरदुखी, अंगदुखी, मलप्रवृत्ती कठीण होणे, शरीर दुर्बल होणे ही लक्षणे दिसू लागतात.
हे लक्षात घ्यायला हवे की, या काळात शरीर धातूंची वाढ थांबलेली असते, त्यामुळे आता जो आहार घेतला जातो; त्याने शरीराचे केवळ यापन होते म्हणजेच शरीर धातूंना ऊर्जा(energy) पुरवली जाते. नवीन धातूनिर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे भूक कमी होऊन आहार कमी लागतो. अधिक आहार घेतल्यास पोटात जडपणा निर्माण होतो, अपचन होऊ शकते. त्यामुळे या काळात भूक लागली असेल तेवढेच खावे. मुळात नेहमीच आहार हा भूक चांगली असल्याशिवाय घेऊच नये.
वात दोष वाढत असल्याने तो कमी राहण्यासाठी रोज अभ्यंग करावे. अभ्यंग, बस्ती, शिरोधारा, कर्णपुरण, नेत्रतर्पण इ. मुळे हा वात दोष कमी होण्यास मदत होते. वात दोषामुळे कठीण मलप्रवृत्ती होते. त्यासाठी काही पोटातून घेण्याची औषधे जसे त्रिफळा, अविपत्तीकर चूर्ण, सुखासारक वटी, किंवा कायम चूर्ण यांसारखी औषधे अनेकजण वापरत असतात. परंतु, ही औषधे मल बाहेर काढत असली तरी शरीरात अजूनच रुक्षता करतात. यामुळे वात दोष अजून वाढू शकतो. त्यामुळे अशी औषधे मनाने घेण्याऐवजी वैद्यांकडे जाऊन आपल्या प्रकृतीला योग्य आणि शरीराला घातक नसणारी औषधे अथवा बस्ती इ उपक्रम करावे. योगासने, प्राणायाम यानेही याकाळात या वातावर विजय मिळवता येतो.
वयामुळे निर्माण होणारा ”समजूतदारपणा/समंजसपणा” हा भाव या काळात निर्माण व्हायला हवा. परंतु, “साठी बुद्धी नाठी” या म्हणीनुसार अनेकवेळा ”हेकेखोरपणा“ ही दिसतो.
आयुष्यभराच्या अनुभवांचा साठा या काळात असतो. याकाळात पती, मुले, सूना, नातवंडे यांची साथ अतिशय महत्त्वाची वाटते. ती मिळाली तर उरलेले आयुष्य बहारदार होते.
क्रमशः…..
नवरात्री…भाग ९ (अश्विन शुद्ध नवमी)
जननी जन्मभूमीश्च स्वर्गदपि गरियसी !!
माता – माया/ममता हा भाव जिच्यात आयुष्यभर टिकून राहतो ती माता. मातृत्व हा स्त्रीतत्वाचा विशेष दागिना आहे. अपत्य नसलेल्या स्त्रियांमध्ये सुद्धा ममता हा भाव असतोच.
आयुष्यभर आपल्या आपत्यावर प्रेम करणारी, त्याचे संगोपन करणारी माय, माता, जननी, आई.
स्वामी तिन्ही जगाचा “आई” विना भिकारी….
आपत्यप्राप्तीनंतर स्त्री आणि पुरुष दोघांच्याही जबाबदाऱ्या वाढतात. त्यातील माया करणारी असल्यामुळे अनेक वेळा स्त्री ही त्या जबाबदारीचे ओझे थोडे जास्तच पेलत असते.
सध्या अनेकजण एक किंवा दोन मुले यावर थांबतात. त्यामुळे पहिले मूल झाले की त्याला काय करू आणि काय नको अशी अवस्था बऱ्याच जोडप्यांची होते. अनेक खेळणी, कपडे, विविधप्रकाराचे खाणे पिणे यांची रेलचेल सुरू होते. मात्र हे करत असताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
मागे सांगितले तसे मूल हे अनुकरणशील असते. आपण काय करतो, काय नाही यावर त्याचे लक्ष असते. सध्याची पिढी ही जास्तच सक्रिय (Active) आहे. त्यामुळे त्यांना सांभाळताना पालकांना सतत सतर्क आणि अद्ययावत असावे लागते. मुलांनी जे करू नये असे पालकांना वाटत असेल ते सर्व पालकांनीही करू नये.
माता म्हणून वावरताना एकीकडे माया असली तरी मुलांना शिस्त ही लावावीच लागते. शिस्त ही बोलून न लावता कृतीतून लावली तर ती लवकर लागू शकते.
मूल खात नाही अथवा स्वतःला पुढे वेळ नाही म्हणून त्याच्या मागे धावून अथवा अपत्याला भूक नसताना बळजबरीने खायला घालणे, मुलांना आवडते म्हणून सतत घरात बेकरी प्रॉडक्ट्स, chocolates, बिस्किटे, यांचे डबे भरलेले ठेवणे, ह्यामुळे मुलांना अनेकवेळा जेवणापेक्षा याच गोष्टी खाण्याची आवड आपणच निर्माण करतो. आपल्याला खूप छान जमतात म्हणून पथ्यकर पदार्थांपेक्षा अपथ्यकर पदार्थ सतत बनवत जाणे. (अर्थात् पथ्यकर पदार्थ कोणते आणि अपथ्यकर पदार्थ कोणते हेच अनेकांना माहीतच नसते…असो) रोजच्या पोळीभाजीपेक्षा इतर पदार्थांना अधिक महत्त्व देणे. या सर्व गोष्टींनी आपण आपले आणि आपल्या घराचे स्वास्थ्य बिघडवत असतो …..ही माया/प्रेम असू शकत नाही.
“मला लहानपणी जमले नाही म्हणून माझ्या आपत्यकडून मी सर्व करवून घेणार अथवा “मुलगी म्हणून मला जे जे जमू शकले नाही ते ते माझी मुलगी करेल अथवा मुलीने करावे” अशी अपेक्षा असणाऱ्या स्त्रिया मुलींना समजून घेऊ शकत नाहीत अथवा “मी जे केले नाही ते माझ्या मुलांनीही करूच नये” असे सतत त्यांच्यावर बिंबवत राहिल्याने अनेकवेळा अपत्य आपल्यापासून दूर होण्याची शक्यता असते.
नोकरी करत असलेल्या अनेकजणी ह्या घर सांभाळून सर्व गोष्टी करत असतात. त्यात घरातील आणि ऑफिसमधील कामाबरोबरच अनेकवेळा स्वतःचे छंदही जोपासत असतात. पाळीच्या दिवशी पोटात दुखत असून/नसून शारीरिक काम करणाऱ्या, नाच करणाऱ्या, पळणाऱ्या, खेळणाऱ्या, स्त्रिया आणि मुली शरीराची ओढाताण करत असतात आणि त्यामुळे अनेक आजारांना बळी पडू शकतात. योग्य वेळी आराम, प्रमाणबद्ध व्यायाम, प्राणायाम आणि पथ्यकर आहार हा शरीर सुदृढ आणि सुडौल ठेवण्यासाठी गरजेचा असतो.
माता ही आपत्यासाठी त्याचे सर्वस्व असते. तिला देवतेप्रमाणे मानले जाते. ते देवत्व प्राप्त होण्यासाठी तिने स्वतःला त्या मुशीत घडवावे लागते…तेव्हाच म्हणता येते…….मातृ देवो भव l ![]()
क्रमशः…..
नवरात्री…भाग १० (अश्विन शुद्ध दशमी)
(वैदिक तत्वज्ञान माहित असणाऱ्यांसाठी)
प्रकृति – स्त्रीचे मूळ स्वरूप
९ दिवस स्त्रीच्या विविध अवस्था, तिची विविध रूपे, त्या रूपांची वैशिष्ठ्ये, त्या विविध अवस्थेत तिला होणारे रोग, त्याची आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून चिकित्सा हे सर्व आपण मागील ९ लेखात पाहिले…आज याची सांगता करत आहे.
सांख्य तत्वज्ञानानुसार सृष्टी/समष्ठीचे सर्जन करू शकणारे अनादी/अनंत असे तत्व म्हणजे प्रकृति.
ईश्वरी प्रेरणेने निर्गुण निराकार अशा पुरुषासह संयोग पावल्यानंतर महत् (बुद्धी), अहंकार, पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूते असा प्रवास करून नवनिर्मिती करू शकणारे तत्व म्हणजे प्रकृति.
अनादी, अनंत, अलिंग, अचेतन, सगुण/त्रिगुणात्मक(सत्व, रज, तम युक्त) बीजधर्मी, प्रसवधर्मी, अमध्यस्थधर्मी (बंध – मोक्ष सुख – दुःख इ विकारांनी युक्त) अशी ही प्रकृति.
तन्मयान्येव भूतानि तद्गुणान्येव चादिशेत् ।
तैश्च तल्लक्षणः कृत्स्नो भूतग्रामो व्यजन्यत ।।
तस्योपयोगोऽभिहितश्चिकित्सां प्रति सर्वदा ।
भूतेभ्यो हि परं यस्मान्नास्ति चिन्ता चिकित्सिते ।। सुश्रुत संहिता
अश्या त्रिगुणात्मक प्रकृतिमुळेच अनेक विकार, विविध प्रकारचे आकाश, वायु, जल, अग्नी, दगड, माती, वनस्पती, प्राणी, मनुष्य इ उत्पन्न होतात, असे मानले जाते.
अशी ही प्रकृति पुरुषासह कार्यकारी नसेल तर सृष्टीनिर्मिती होते आणि जर ती पुरुषापासून विलग झाली तर प्रलय अथवा विनाश होईल.
अशी ही प्रकृतीच मानवाच्या निर्मितीसाठी स्त्री आणि पुरुष रूपाने सर्जनशील होते.
मात्र ती जेव्हा स्त्री रूपात दुष्टांचा/हिंसा करणाऱ्यांचा संहार करू शकते आणि कल्याणकारी आणि मंगलमय सृष्टी निर्माण करते, तेव्हा तिला देवत्व प्राप्त होते.
दीव्यतीति प्रवृत्तिनिवृत्त्युपदेशेन यथाधिकारं व्यवहारयति सर्वान् देव(णिच् प्रत्यय) देवी l वाचस्पत्य
अशा ह्या सर्व स्त्रीतत्वांना साष्टांग नमस्कार ll![]()
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।